Baramati News : डॉ. राजेंद्र पाटील यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान !

बारामती : डेलॉनिक्स सोसायटीच्या बारामती कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांना लिटमस फाउंडेशनच्या वतीने “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माझे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील पत्रकार भवनात येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लिटमस फाउंडेशनच्या माध्यमातून दर वर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात येते. यंदाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विधीतज्ञ डॉ. ॲड. सुधाकरराव आव्हाड, माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, ज्येष्ठ पत्रकार अशोकराव वानखेडे, प्रसिद्ध साहित्यिक श्रीकांत देशमुख, तसेच सह आयुक्त अन्न व प्रशासन विभाग गिरीश हुकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. राजेंद्र पाटील यांना हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील असामान्य योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या अथक कष्ट आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या विविध सुधारणांसाठी देण्यात आला. शैक्षणिक कार्यात २५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या डॉ. पाटील यांचे नेतृत्व, शिस्त, विद्यार्थ्यांसोबतचे संवाद कौशल्य आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यातील दिशा ठरवण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
बारामती कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्यपदी कार्यरत असलेले डॉ. पाटील यांनी कॉलेजच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये अनेक नवीन बदल केले. विद्यार्थ्यांसाठी नवनवीन शैक्षणिक संधी निर्माण करून, त्यांना समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून घडवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये यश प्राप्त केले असून, कॉलेजचे शैक्षणिक दर्जा उंचावला आहे.
“शिक्षक हे समाजाला दिशा देणारे प्रणेते आहेत. डॉ. राजेंद्र पाटील यांसारखे शिक्षक आपल्या कार्याने एक आदर्श निर्माण करतात,” असे मत विद्याधर अनास्कर यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लिटमस फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित माने, अमोल परदेशी, अभिलाष मोरे आणि राजदीप माने देशमुख यांचे विशेष आभार व्यक्त केले गेले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा पुरस्कार समारंभ यशस्वी झाला.
हा पुरस्कार समारंभ केवळ एक आदर्श शिक्षक म्हणून डॉ. राजेंद्र पाटील यांची मान्यता नव्हे, तर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या इतर शिक्षकांसाठीही प्रेरणादायक ठरला. “आदर्श शिक्षक पुरस्कार” म्हणजे केवळ एक सन्मानच नाही, तर शिक्षणात नवे आयाम दाखवणाऱ्या शिक्षकांच्या कर्तृत्वाची कृतज्ञता व्यक्त करणारा एक मोठा पदक आहे.





