Baramati News : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबचे उद्घाटन

बारामती : बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या सायन्स अँड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरमधील टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबचे उद्घाटन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या सेंटरमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), कोडिंग, रोबोटिक्स, अंतराळ विज्ञान आणि पर्यावरण तंत्रज्ञानासारख्या आधुनिक विषयांची ओळख होईल. यातून भविष्यात नवे संशोधक घडतील आणि हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला खासदार शरदचंद्र पवार, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची संधी
राज्य शासनाने सहा सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर्ससाठी २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापैकी बारामती ट्रस्टने प्रथम प्रस्ताव सादर केल्याबद्दल अजित पवार यांनी अभिनंदन केले. ते म्हणाले, “या सेंटरमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळेल. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर आता सर्व क्षेत्रांत अनिवार्य होत आहे. शेतीतही याचा उपयोग व्हावा यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद केली आहे. पहिल्या टप्प्यात ५० हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.” त्रुटी असल्यास सुधारणांसाठी नागरिकांनी सूचना द्याव्यात, निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, पहिल्या टप्प्यात १ हजार शिक्षकांना ‘एआय’ प्रशिक्षण आणि नवी मुंबईत २५० एकरावर ‘नाविन्यता नगर’ उभारण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशातील पाच विद्यापीठांशी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाची संधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे.
कृषी आणि शिक्षणात ‘एआय’ क्रांती; डॉ. काकोडकरांचे मार्गदर्शन
खासदार शरदचंद्र पवार यांनी सांगितले की, हे सेंटर विज्ञान क्षेत्रातील नव्या पिढीला प्रेरणा देईल. “बारामती शैक्षणिक हब बनले आहे. ‘एआय’च्या वापराने शेतीचे अर्थकारण बदलण्यास मदत होईल,” असे ते म्हणाले. डॉ. अनिल काकोडकर यांनी सेंटरला पथदर्शी प्रकल्प ठरवताना, प्रत्येक शाळेत अशा सुविधा असाव्यात, अशी सूचना केली. ते म्हणाले, “काळाची गरज ओळखून संशोधनात्मक आणि कृतीशील शिक्षण देणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढेल आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल.”
उपमुख्यमंत्री पवार यांनी व्हर्चुअल रियालिटी, रोबोटिक्स, होलोग्राम तंत्रज्ञानासह सेंटर आदी नावीन्यपूर्ण प्रकल्पांची पाहणी करत माहिती घेतली. सेंटरच्या प्रमुख हिना भाटिया यांनी प्रकल्पांची माहिती दिली.यावेळी विद्यानिकेतन ट्रस्ट आणि कल्पना चावला स्पेस अकादमी, लोणावळा यांच्यात सामंजस्य करार झाला. तसेच, पेटंट प्राप्त प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पवार यांनी केले.





