Baramati News : बारामतीतील रेड बर्ड एव्हिएशन अकॅडमीविरुद्ध नागरिकांचा संताप

बारामती : बारामती येथील रेड बर्ड एव्हिएशन ट्रेनिंग अकॅडमीविरुद्ध स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार घडणारे विमान अपघात, प्रशिक्षणार्थींचे बेजबाबदार वर्तन आणि संस्थेच्या व्यवस्थापनातील ढिसाळपणा यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला आणि दैनंदिन जीवनाला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस वैभव सोलणकर यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
अपघातांची मालिका: देखभालीतील त्रुटी की प्रशिक्षणातील कमतरता?
गेल्या काही महिन्यांत रेड बर्ड अकॅदमीच्या प्रशिक्षण विमानांचे सातत्याने अपघात घडले आहेत. हे अपघात नागरी वस्त्यांजवळ किंवा शेती परिसरात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संस्थेकडून अपघातांच्या कारणांबाबत स्पष्टता दाखवली जात नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. अपुरी देखभाल, प्रशिक्षकांची कमतरता आणि प्रशिक्षणार्थींची अयोग्य तयारी ही या अपघातांची प्रमुख कारणे असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
प्रशिक्षणार्थींचे समाजविघातक वर्तन
रेड बर्ड अकॅडमीतील काही प्रशिक्षणार्थी पायलट्स सार्वजनिक ठिकाणी उद्धटपणा, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. स्थानिक दुकाने, सार्वजनिक वाहतूक मार्ग आणि परिसरात या विद्यार्थ्यांकडून गोंधळ, ध्वनीप्रदूषण, मद्यपान करून अरेरावी आणि बेदरकारपणे वाहन चालवणे असे प्रकार घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे सामाजिक शिस्त आणि नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
सुरक्षेसाठी कठोर नियमावलीची मागणी
वैभव सोलणकर यांनी केंद्र सरकारकडे देशभरातील पायलट प्रशिक्षण संस्थांसाठी कठोर सुरक्षा नियमावली तयार करण्याची मागणी केली आहे. यामध्ये विमानांची नियमित देखभाल, प्रशिक्षकांची पात्रता, विद्यार्थ्यांच्या वर्तनावर नियंत्रण, स्थानिक प्रशासनाशी समन्वय आणि अपघातांची सखोल चौकशी यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.
मंत्री मोहोळ यांच्याकडे निवेदन
भाजपा युवा मोर्चाच्या वतीने वैभव सोलणकर यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवेदन सादर करून रेड बर्ड अकॅडमीविरुद्ध तात्काळ चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष जगदीश कोळेकर, भाजपा नेते प्रमोद खराडे, शहर अध्यक्ष विवेक साळुंके, युवा नेते संदीप केसकर, हिरामण लोंढे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.रेड बर्ड अकॅडमीच्या कारभारामुळे बारामतीतील नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, याप्रकरणी तात्काळ उपाययोजना होणे अपेक्षित आहे.
“रेड बर्डसारख्या पायलट प्रशिक्षण संस्थांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी. बारामतीसारख्या संवेदनशील भागामध्ये अशा संस्थांसाठी स्वतंत्र नियामक फ्रेमवर्क असणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणताही तडजोड स्वीकारला जाणार नाही,”
वैभव सोलणकर,
सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा,पुणे जिल्हा





