Baramati News – बारामती तालुका हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. किरण तावरे हे पणदरे गटातून पंचायत समितीसाठी निवडून आले आहेत. त्यांच्या कामाचा अनुभव आणि संघटन कौशल्य लक्षात घेऊन त्यांच्यावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्याचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. किरण तावरे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या पत्नी मीनाक्षी तावरे या यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे तावरे कुटुंबाला स्थानिक राजकारणाचा मोठा अनुभव असल्याचे मानले जाते. दरम्यान, ही निवड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या निवडीमुळे बारामती तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. सभापतीपदी निवड झाल्यानंतर किरण तावरे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. शेतकरी, महिला आणि युवकांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सर्वसामान्यांशी नाळ जोडणारे पदाधिकारी सभापतीपदी सांगवी येथील किरण तावरे तर उपसभापतीपदी गुणवडी गणातील शुभांगी आगवणे यांनी संधी मिळाल्याने बारामती तालुक्यातील संघटनाची व्याप्ती आणखी मजबूत होणार आहे. (स्व) अजित पवार यांच्या निवडीप्रमाणे सुनेत्रा पवार यांनी प्रबळ, संघटनेला तसेच राष्ट्रवादीला फायदा होईल, अशा तावरे, आगवणे यांनी पद दिल्याने बारामती तालुक्यातून स्वागत होत आहे. पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी बारामती पंचायत समिती सभापतीपदी सांगवी येथील किरण रावसाहेब तावरे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापती पदी गुणवडी पंचायत समिती गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समतोल साधला आहे.