Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी होणार; व्हीएसआर कंपनीचे वरिष्ठ ऑफिसर सीआयडी कार्यालयात हजर
Ajit Pawar Plane Crash : आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनी तसेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

Ajit Pawar Plane Crash : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळ झालेल्या विमान अपघाताला एक महिना उलटला असून चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आज व्हीएसआर विमान कंपनीचे वरिष्ठ ऑफिसर पुण्यातील सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले.
या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी कंपनीच्या मालकाची चौकशी करण्याची मागणी केली होती. सीआयडी अधिकाऱ्यांकडून रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने विविध प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातात त्यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आर.के. सिंह यांनी त्यांच्या कंपनीच्या विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचा दावा केला होता. मात्र, त्यानंतर ते माध्यमांसमोर आले नव्हते.
दरम्यान, या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनी तसेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. अपघातापूर्वी विमानाचा वैमानिक ऐनवेळी बदलण्यात आल्याचा तसेच विमानात गरजेपेक्षा जास्त इंधन साठवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विमानतळ परिसराची रेकी केल्याचा दावा
याशिवाय, अपघातापूर्वी विमानतळ परिसराची रेकी करण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. अपघातानंतर सादर झालेल्या प्राथमिक अहवालातील त्रुटींवरून रोहित पवार यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयावर (डीजीसीए) टीका केली आहे. अहवालात जाणीवपूर्वक मूलभूत चुका करण्यात आल्याचा दावा करत, डीजीसीए नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा:
Ali Khamenei Funeral: खामेनी यांचा दफनविधी ‘या’ कारणासाठी पुढे ढकलला ; वाचा नेमकं काय असेल कारण





