Baramati Nagar Parishad : बारामती नगरपालिकेला “माझी वसुंधरा अभियान ५.०” मधील राज्यातील प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार मिळाला असून तो पुरस्कार आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहून अर्पण करण्यात आला आहे. हा क्षण प्रत्येक बारामतीकरांसाठी अभिमानाचा आणि तितकाच भावनिक ठरला आहे. भूमी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित राज्यस्तरीय स्पर्धेत ४० हजार ते १ लाख लोकसंख्या गटामध्ये बारामती नगरपरिषदेने अव्वल क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे “माझी वसुंधरा अभियान ४.०” आणि “५.०” असे सलग दोन वर्षे बारामती नगरपरिषदेला हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि जतन यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण व नियोजनबद्ध कामाची ही राज्यस्तरीय पावती आहे. हा मानाचा पुरस्कार डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. बारामती नगरपरिषदेच्या वतीने हा पुरस्कार नगराध्यक्ष सचिन सदाशिव सातव, उपनगराध्यक्ष श्वेता योगेश नाळे, मुख्याधिकारी, आरोग्य सभापती, नगरसेवक तसेच कर्मचारीवृंद यांनी स्वीकारला. विशेष म्हणजे, यावेळी बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक व कर्मचारी यांनी “आम्ही अजित दादांचे वसुंधरा दूत” असे लिहिलेल्या टोप्या परिधान करून उपस्थिती लावली होती. या प्रतीकात्मक कृतीतून त्यांनी आदरणीय अजित पवार दादांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या पर्यावरणपूरक विचारांना पुढे नेण्याचा संदेश दिला. या यशामागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि विकासाभिमुख विचार मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. दादांनी पाहिलेलं स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बारामतीचं स्वप्न आज प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे. हा पुरस्कार दादांना कृतज्ञतापूर्वक अर्पण करत त्यांच्या अपूर्ण स्वप्नपूर्तीसाठी सर्वांनी पुन्हा एकदा कटिबद्धता व्यक्त केली. “हा पुरस्कार केवळ नगरपरिषदेचा नाही, तर संपूर्ण बारामतीकरांचा आहे. आदरणीय अजितदादांनी पाहिलेल्या स्वच्छ व पर्यावरणपूरक बारामतीच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दिशेने आपण एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पुढील काळातही हे यश टिकवून ठेवत बारामतीला राज्यातच नव्हे तर देशातही आदर्श शहर बनविण्याचा आमचा प्रयत्न राहील.” -सचिन सदाशिव सातव, नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद “‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ आणि ‘५.०’ मध्ये सलग मिळालेला हा प्रथम क्रमांक म्हणजे सातत्यपूर्ण नियोजन, काटेकोर अंमलबजावणी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाचे फलित आहे. पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ अधिक व्यापक करत पुढील सर्व स्पर्धांमध्येही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आमचा निर्धार आहे.” -पंकज भुसे, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद