Sunetra Pawar : बारामतीच्या पराभवानंतरही अखेर सुनेत्रा पवार बनल्या खासदार! राज्यसभेवर बिनविरोध निवड

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची गुरुवारी (13 जून) राज्यसभेसाठीच्या रिक्त जागेवर बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे (अजित गट) खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाल्यानंतर पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्यासमोर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे होत्या. निवडणुकीत सुनेत्रा आपल्या नंदेकडून सुमारे दीड लाख मतांनी पराभूत झाल्या होत्या.
हा अर्ज दाखल करतेवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारांसह पक्षाचे अन्य नेतेमंडळी देखील उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल 2022-28 साठी राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर पक्ष फुटला आणि अजित पवार काका शरद पवार यांच्यापासून वेगळे झाले. या वेळी प्रफुल्ल यांनी अजित पवार यांना साथ दिली. त्याच वेळी शरद पवार यांनी पटेल यांच्याविरोधात दहाव्या अनुसूचीच्या कलम 2 (अ) अंतर्गत अपात्रतेची याचिका दाखल केली. यानंतर, प्रफुल्ल यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीने (अजित गट) त्यांना राज्यसभेच्या नवीन कार्यकाळासाठी नामनिर्देशित केले.
बारामतीत सुप्रिया सुळेंची सरशी
सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. सुप्रिया यांनी त्यांचा 1 लाख 58 हजार 333 मतांनी पराभव केला. बारामती मतदारसंघ हा 57 वर्षांपासून पवार घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. शरद बारामतीतून 1991, 1996, 1998 आणि 2004 मध्ये सलग खासदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये त्यांनी ही जागा त्यांची मुलगी सुप्रिया यांना दिली. सुप्रिया 2009, 2014 आणि 2019 मध्ये येथून विजयी झाल्या होत्या. सुनेत्रा यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती.
मी नाराज नाही- भुजबळ
महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ याबद्दल बोलताना म्हणाले की, पक्षाच्या कोअर ग्रुपच्या सदस्यांनी एकमताने सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांना ती जागा हवी होती, पण चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवायचे, असा निर्णय आम्ही घेतला आहे. या निर्णयाने मी अजिबात नाराज नाही.





