Baramati By-Election: उद्धव ठाकरेंचा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा ?
Baramati By-Election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

Baramati By-Election: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बारामती पोटनिवडणुकीबाबत मोठा निर्णय घेण्याची चर्चा झाली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले. या फोननंतर शिवसेनेत हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बैठकीला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हेही उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या आवाहनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ठाकरे आणि पवार कुटुंबातील जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता शिवसेना सुनेत्रा पवार यांच्या बाजूने उभी राहण्याची चिन्हे आहेत.
काॅंग्रेसचा उमेदवार उद्या जाहीर होणार?
दरम्यान, काँग्रेसनेही या निवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्यापर्यंत उमेदवार जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, काँग्रेसने उमेदवार दिल्यास शिवसेना त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा न देता सुनेत्रा पवार यांनाच साथ देईल, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांचे जवळचे संबंध होते. त्यामुळे या प्रकरणातील अंतिम निर्णय उद्धव ठाकरे स्वतः घेतील आणि त्याबाबत लवकरच स्पष्ट भूमिका मांडतील.
हेही वाचा – MLC Election 2026: विधान परिषदेच्या निवडणूकीत शरद पवार करणार ‘परतफेड’!
राऊत यांनी हेही स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार यांचा पक्ष सध्या भाजपसोबत आहे आणि महाविकास आघाडीत नाही. काँग्रेस वेगळा निर्णय घेत असेल तर त्यावर आघाडीच्या पातळीवर चर्चा होणे गरजेचे आहे. तसेच, बिनविरोध निवडणुकीबाबत सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसशी चर्चा केली आहे का, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यासाठी उद्धव ठाकरे लवकरच पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.




