Bar Council : राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तब्बल दीड लाख मोजावे लागणार आहे. अर्ज, अनामत रक्कम तसेच मतदार यादीसाठीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या परिषदेची निवडणूक ही गुणवंत तसेच अनुभवी वकिलांची आहे की आर्थिकदृष्ट्या संपन्न वकीलांची असा प्रश्न वकील उपस्थित करत आहेत. बार परिषदेसाठी २४ मार्च रोजी मतदान असून त्याची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज सादर करताना उमेदवारांना तब्बल सव्वा लाख अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम निवडणूक संपल्यानंतर परत मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मागील निवडणुकीवेळी ही रक्कम २५ हजार रुपये होती. गत निवडणुकांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय असल्याने अनेक इच्छुकांनी उमेदवारीबाबत पुनर्विचार सुरू केला आहे. याखेरीज एकपानी उमेदवारी अर्जासाठी तीन हजार शुल्क आकारण्यात येत आहे. मतदार यादीसाठी दहा हजार वेगळे मोजावे लागणार आहेत. मुंबईला अर्ज भरण्यासाठी जावे लागणार असून अर्ज, अनामत रक्कम आणि मतदार यादी, प्रवास खर्च मिळून जवळपास दीड लाखांचा खर्च उमेदवाराला सहन करावा लागणार आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांशी संपर्क, बैठका, प्रवास, निवास, प्रचार साहित्य, डिजिटल मोहीम, बॅनर-पोस्टर आदी खर्च गृहीत धरला तर खर्च आणखी वाढणार आहे. ‘बार कौन्सिलची निवडणूक प्रक्रीया महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसह दोन केंद्रशासित प्रदेशात राबवली जाते. यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च आहे. पूर्वी २५ हजार आकारण्यात येणारे सनद शुल्क आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ७५० रुपये घेण्यात येत आहे. उत्पन्नाचे दुसरे स्त्रोत नसल्याने कौन्सिलने अनामत रक्कमेमध्ये वाढ केली आहे. अनामत रक्कम कमी करण्याबाबत दाखल केलेल्या दोन याचिका फेटाळत सर्वौच्च न्यायालयाने कौन्सिलच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. अनामत रक्कम वाढविण्याचा निर्णय योग्य आहे.’ -ॲड. मंगेश लेंडघर, गेल्या वेळी बार कौन्सिलची निवडणूक लढवलेले उमेदवार ‘राज्य वकील परिषद ही वकिलांच्या प्रश्नांसाठी लढणारी सर्वोच्च संघटना आहे. या संघटनेच्या निवडणुकीत आर्थिक अडथळे उभे राहणे योग्य नाही. अनामत रक्कम आणि इतर शुल्कांमध्ये झालेली मोठी वाढ ही सर्वसामान्य, ग्रामीण भागात काम करणाऱ्या आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या वकिलांसाठी मोठा अडथळा ठरत आहे. निवडणूक ही गुणवत्तेची आणि कामगिरीची असावी; पैशांची स्पर्धा होऊ नये. या संदर्भात परिषदेकडून फेरविचार व्हावा, अशी आमची मागणी आहे.’ – ॲड. विष्णु तापकीर, प्रसिध्द वकील Palakmantri Chashak 2026 : कोयनानगरमध्ये क्रिकेटचा महासंग्राम; पालकमंत्री चषकासाठी जल्लोषमय तयारी