Pune District : बाप्पा आले, पण प्रशासनाला जाग कधी येणार?
Pune District : बुद्धीची देवता म्हणून गणरायाची पूजा केली जाते. त्यामुळे यंदा गणेशभक्तांकडून बाप्पाकडेच एक वेगळी मागणी केली जात आहे.

आळेफाटा : ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात सोमवारी आळेफाटा परिसरात लाडक्या गणरायाचे उत्साहात आगमन झाले. घरोघरी मंगलमय वातावरण असताना अबालवृद्धांनी बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली. मात्र, या उत्साहावर परिसरातील खड्डेमय रस्ते आणि रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचर्याने काहीशी विरजण टाकली आहे.
बुद्धीची देवता म्हणून गणरायाची पूजा केली जाते. त्यामुळे यंदा गणेशभक्तांकडून बाप्पाकडेच एक वेगळी मागणी केली जात आहे. हे गणराया, आळे, राजुरी, वडगाव आनंद, पिंपळवडी आणि बेल्हे परिसरातील खड्डे व कचर्याची समस्या दूर करण्याची सद्बुद्धी प्रशासनातील भोळ्या भक्तांना दे! अशी उपरोधिक प्रार्थना करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आळेफाटा परिसरातील रस्त्यांवरील खड्डे आणि कचर्याची समस्या नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरुस्ती आणि स्वच्छता होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, उत्सव सुरू झाला तरी खड्डे ‘जैसे थे’ आणि कचरा ‘तैसाच’ असल्याचे चित्र आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीतही रस्त्यांवरील खड्डे आणि कचर्याच्या दुर्गंधीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. उत्सवाच्या काळात नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी खड्डे बुजवावेत आणि कचर्याची तातडीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्यापही या समस्यांवर ठोस उपाय झालेला नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. पावसामुळे अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. गणेश मंडळांच्या मिरवणुका, देखावे आणि दर्शनासाठी बाहेर पडणार्या नागरिकांना खड्ड्यांतून तसेच कचर्याच्या दुर्गंधीतून मार्ग काढावा लागत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात तरी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कचर्याची विल्हेवाट लावून धोकादायक खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वी प्रशासनाला जाग आली नाही; आता बाप्पाच्या उपस्थितीत तरी प्रशासन जागे होणार का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
‘स्वच्छतेचा संदेश’ अन् प्रत्यक्षात कचर्याचे ढीग
एकीकडे गणेशोत्सवातून स्वच्छतेचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे रस्त्याच्या कडेला साचलेले कचर्याचे ढीग आणि दुर्गंधी अशी विसंगत परिस्थिती परिसरात दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात गणेशभक्तांना बाप्पाच्या दर्शनासोबत खड्डे आणि कचर्याचेही ‘दर्शन’ घ्यावे लागणार का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.





