नालासोपाऱ्यात “चोर की पोलीस?’चे बॅनर्स

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वाद चिघळण्याची शक्‍यता

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नालासोपारा मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच नालासोपाऱ्यात “चोर की पोलीस?’ असे लिहिलेल्या पोस्टरमुळे मोठा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

पोस्टरमधील चोर हा शब्द विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर आणि त्यांचा पक्ष बहुजन विकास आघाडी यासाठी वापरण्यात आला आहे. तर पोलीस हा शब्द या मतदारसंघातून इच्छुक असलेले आणि नुकतेच शिवसेनेत सामील झालेले प्रदीप शर्मा यांच्यासाठी वापरण्यात आला आहे. प्रदीप शर्मा यांनी आपल्या पोलीस अधिकारी पदाचा राजीनामा देत शिवबंधन हातात बांधले आहे.

शिवसेनेत सामील झाल्यानंतर प्रदीप शर्मा यांनाच या मतदारसंघातून तिकीट मिळेल अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. मात्र निवडणूका जाहीर होण्याआधीच “चोर की पोलीस?’ या पोस्टरमुळे नालासोपाऱ्यातील वातावरण तापले आहे. ज्या एजन्सीने हे बॅनर्स लावले आहेत, त्यांना फोन करुन धमक्‍या दिल्या जात आहेत.

दरम्यान, 30 वर्षांपासून कुशासन चालवणाऱ्या लोकांचा आता अस्त होणार आहे. परिसरात लागलेले बॅनर्स योग्य आहेत, अशी प्रतिक्रिया प्रदीप शर्मा यांनी दिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here