Indapur News : हजारो रुपयांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त
Indapur News : नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याच्या तसेच ऑनलाइन माध्यमातून त्याची खरेदी-विक्री केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील विविध भागांमध्ये तपासणी केली.

इंदापूर : नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर नागरिक, दुचाकीस्वार तसेच पक्षी आणि प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित चायनीज नायलॉन मांजाविरोधात इंदापूर नगरपरिषदेने धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईला सोमवारी (दि. १७) आणखी वेग देत शहरातील विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली. या कारवाईत हजारो रुपये किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.
नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याच्या तसेच ऑनलाइन माध्यमातून त्याची खरेदी-विक्री केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील विविध भागांमध्ये तपासणी केली. प्रतिबंधित मांजा विक्री करणारे दुकानदार, साठवणूक करणारी ठिकाणे तसेच विक्रीची शक्यता असलेल्या परिसरांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
इंदापूर नगरपरिषदेने यापूर्वीच अनेक दुकानदारांना प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री अथवा साठवणूक न करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात आली आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्याने नगरपरिषदेने आता कारवाईचा बडगा उगारला आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग प्रमुख अनिरुद्ध चव्हाण, सहाय्यक आरोग्य निरीक्षक सुनील लोहिरे, लिलाचंद पोळ, मुकादम दत्तात्रय ढावरे, अशोक अडसूळ, अशोक चिंचकर आणि दीपक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. लक्ष्मण लोखंडे, ओंकार साळुंखे, सिद्धार्थ मखरे, कुणाल चव्हाण, अमित मखरे, महेश मखरे आदी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी तपासणी मोहिमेत सहभाग घेतला.
‘मांजा’ दिसला तर प्रशासनाला कळवा
प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसोबत पक्षी आणि प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधित मांजाविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी स्पष्ट केले.





