Dhananjay Munde : “पोलिसांना आडनाव लावण्याचीही बंदी? धनंजय मुंडेंनी उपस्थित केला सामाजिक समतेचा प्रश्न

बीड: “बीड जिल्ह्यात पोलिसांना आपलं आडनाव लावता येत नसेल, तर ही कोणती सामाजिक समता?” असा सवाल माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. बीड येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित सत्यशोधक समाज भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना त्यांनी सामाजिक समतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समाजात जाती-जातीत विभागणी करणाऱ्या मानसिकतेवर त्यांनी भाष्य केलं.
धनंजय मुंडे म्हणाले, “आज आपण प्रत्येक महापुरुषाला जातीच्या चौकटीत अडकवतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठ्यांनी साजरी करायची का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केवळ मागासवर्गीयांनी साजरी करायची का? महात्मा फुलेंनी सुरू केलेली शिक्षणाची चळवळ फक्त माळी समाजासाठी आहे का? भगवान बाबांची जयंती वंजारी समाजापुरती मर्यादित आहे का?” या प्रश्नांद्वारे त्यांनी समाजातील विभाजनावर बोट ठेवलं.
ते पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य अठरा पगड जातींसाठी उभं केलं. डॉ. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान सर्वांसाठी आहे. अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून उपेक्षितांची व्यथा मांडली, ती सर्व समाजासाठी होती. महात्मा फुले यांनी शिक्षणाची चळवळ सर्वांसाठी उभी केली.”
मुंडे यांनी आवाहन केलं की, महापुरुषांचं कार्य सर्वसमावेशक आहे. त्यांना जातीच्या बंधनात अडकवण्याऐवजी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन सर्वसमाजिक कार्य करावं. “महापुरुषांचे विचार जातीपलीकडे जाऊन सर्वांना प्रेरणा देणारे आहेत. त्यांचा आदर्श घेऊन सामाजिक समता साध्य करूया,” असंही ते म्हणाले.





