पिंपरी-चिंचवड : सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालून सांगवी येथील एका वृद्ध महिलेची फसवणूक करण्याचा डाव अॅक्सिस बँक, रहाटणीच्या ऑपरेशन हेड प्रियंका पाटील यांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी प्रियंका पाटील आणि संबंधित महिलेचा पुष्पगुच्छ देऊन पोलिस आयुक्त कार्यालयात सत्कार केला. काय घडले प्रकरण? 28 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता सांगवी येथील एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेला अज्ञात महिलेने व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संपर्क साधला. तिने सांगितले की, महिलेच्या क्रेडिट कार्डवर 3 लाखांचे कर्ज आहे आणि त्याची परतफेड न झाल्याने बँकेने मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. बेंगलोरला जाऊन केसबाबत माहिती घेण्यास सांगितले, पण एकट्या महिलेला ते शक्य नसल्याचे कळवल्यावर अज्ञात व्यक्तीने एक मोबाइल नंबर देऊन व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. व्हिडीओ कॉलवर ‘विजय पाटील’ नावाच्या कथित पोलिस अधिकाऱ्याने महिलेची चौकशी केली आणि केस ‘संदीप राव’ यांच्याकडे सोपवल्याचे सांगितले. संदीप राव यांनी 3 तासांच्या मुलाखतीत महिलेचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक तपशील, कौटुंबिक माहिती आणि नातेवाइकांची माहिती घेतली. त्यांनी महिलेला कोणालाही याबाबत सांगू नये, घराबाहेर न पडण्यास आणि फोन टॅप केल्याचे सांगत चालू ठेवण्यास सांगितले. पुढे, त्यांनी महिलेला ‘मनिष गोयल’ नावाच्या कथित गँगस्टरशी संबंध असल्याचा आरोप लावला आणि तिची केस ‘सीबीआय अधिकारी दिपारनिती मुन्शीकर’ यांच्याकडे गेल्याचे सांगितले. या कथित सीबीआय अधिकाऱ्याने महिलेला सर्व बँक खाती आणि एफडी तोडून पैसे एका खात्यात जमा करण्यास सांगितले. प्रियंका पाटील यांची सतर्कता महिला अॅक्सिस बँक, रहाटणी येथे एफडी तोडण्यासाठी गेली असता, ऑपरेशन हेड प्रियंका पाटील यांना संशय आला. त्यांनी महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. शनिवार-रविवारमुळे व्यवहार थांबले, परंतु सायबर गुन्हेगारांनी पुन्हा संपर्क साधून महिलेला दबाव टाकला. सोमवारी आणि मंगळवारी महिलेनं सर्व पैसे एका खात्यात जमा केले. यावेळी प्रियंका पाटील यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून महिलेला ऑनलाइन फसवणुकीबाबत व्हिडीओ दाखवले. हा व्हिडीओ पाहून महिलेची खात्री पटली आणि त्यांनी पैसे हस्तांतरित केले नाहीत, ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान टळले. पोलिस कारवाई आणि सत्कार महिलेच्या तक्रारीवरून सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू आहे. प्रियंका पाटील आणि त्यांच्या वरिष्ठांच्या प्रयत्नांमुळे वृद्ध महिलेची फसवणूक टळली. याची दखल घेऊन पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी प्रियंका पाटील आणि महिलेचा सत्कार केला. या प्रसंगी अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे, तसेच अॅक्सिस बँकेचे वरिष्ठ अधिकारी सृष्टी नंदा (सर्कल हेड), प्रदीप आगरवाल (रिजनल बीसीयु हेड), श्रीकांत बोराडे (उपाध्यक्ष, पुणे सर्कल ऑफिस) आणि आनंद चौधरी (पिंपरी क्लस्टर हेड) उपस्थित होते. सायबर गुन्ह्यांविरुद्ध जागरूकतेचे महत्त्व या घटनेने सायबर फसवणुकीविरुद्ध जागरूकतेची गरज अधोरेखित झाली आहे. प्रियंका पाटील यांच्या सतर्कतेने केवळ आर्थिक नुकसान टळले नाही, तर सायबर गुन्हेगारांचा डाव उधळला गेला. पोलिसांनी नागरिकांना अशा कॉल्सवर विश्वास न ठेवण्याचे आणि बँक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.