Banjara reservation : माझ्या आत्महत्येला सरकार जबाबदार.! बंजारा आरक्षणासाठी तरुणाने जीवन संपवले

Banjara reservation – गेवराई तालुक्यातील पांगरी गावात बंजारा समाजातील तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रवीण बाबुराव जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, या मागणीवर शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने तो मानसिक तणावात होता.
अखेर त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीणने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्या व्हिडिओत त्याने आपल्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेत बंजारा समाज एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता आतापर्यंत स्थापन केलेले आयोग सकारात्मक होते. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आरक्षण देण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली होती.
त्यानुसार आता बंजारा समाज ही मागणी करू लागला आहे. सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त जाती (अ) प्रवर्गाचे आरक्षण आहे. तर वंजारी समाजाला विमुक्त भटक्या जमाती या प्रवर्गाचे आरक्षण आहे.





