PAK vs BAN 1st Test : बांगलादेशचा ऐतिहासिक विजय, पाकला 10 विकेट्सने पराभूत करत रचला इतिहास…

Pakistan vs Bangladesh 1st Test :- रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात 6 बाद 448 धावा करून डाव घोषित केला. प्रत्युत्तरात बांगलादेशने 565 धावा केल्या आणि 117 धावांची आघाडी घेतली होती. बांगलादेशने दुसऱ्या डावात पाकिस्तानला अवघ्या 146 धावांत गुंडाळत 30 धावांचे लक्ष्य 10 गडी राखून पूर्ण केले. उभय संघांमधील दुसरी आणि शेवटची कसोटी रावळपिंडी येथे 30 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे.
बांगलादेश संघाने रचला इतिहास…
बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली कसोटी 29 ऑगस्ट 2001 रोजी खेळली गेली होती. त्यानंतर आता बांगलादेशने पाकिस्तानला कसोटीत पराभूत करण्याची जवळपास 23 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. तसेच बांगलादेशचा संघ पाकिस्तानला त्याच्याच मायदेशात कसोटीत 10 गडी राखून पराभूत करणारा पहिला संघ ठरला आहे.
Bangladesh 🆚 Pakistan | 1st Test | Rawalpindi
Bangladesh won by 10 wickets 👏🇧🇩
PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/yqNmaQ6rsL— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 25, 2024
दरम्यान, यापूर्वी म्हणजेच रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या कसोटीपूर्वी 13 वेळा बांगलादेश आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्यापैकी 12 लढतीत पाकिस्तानने बांगलादेश संघाला पराभूत केले होते, एक कसोटी अनिर्णित होती. पाकिस्तान दौऱ्यावर असणाऱ्या बांगलादेश संघाने 12 पराभवानंतर पाकिस्तान संघाला त्यांच्या घराच्या मैदानात पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्याचवेळी घरच्या मैदानावर पाकिस्तानचा हा आणखी एक लाजिरवाणा पराभव आहे. संघाने 4 मार्च 2022 पासून घरच्या मैदानावर नऊ कसोटी खेळल्या आहेत त्यापैकी पाच सामने गमावले आहेत तर चार कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.
पाकिस्तान-बांगलादेश पहिला डाव…
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव 6 बाद 448 धावा करून डाव घोषित केला होता. मोहम्मद रिझवानने नाबाद 171 धावा केल्या होत्या. तर सौद शकीलने 141 धावांची खेळी केली होती. सॅम अयुबने 56 धावा केल्या होत्या. बाबर आझम खाते उघडू शकला नाही, तर कर्णधार मसूदने सहा धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून शरीफुल इस्लाम आणि हसन महमूदने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
या खेळीनंतर पाकिस्तान संघ ही कसोटी हरेल असे वाटले नव्हते. बांगलादेशनेही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी पहिल्या डावात 565 धावा केल्या. बांगलादेशकडून फलंदाजीत शदमाम इस्लामने 93 धावा केल्या. तर मुशफिकर रहीमने 191 धावांची उत्कृष्ट खेळी केली. मोमिनुल हकने 50 धावा , यष्टीरक्षक फलंदाज लिटन दासने 56 आणि मेहदी हसन मिराझने 77 धावा केल्या. पाकिस्तान संघाकडून गोलंदाजीत नसीम शाहने तीन बळी घेतले. शाहीन आफ्रिदी, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
पाकिस्तान-बांगलादेश दुसरा डाव…
दुसऱ्या डावात पाकिस्तानची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. मोहम्मद रिझवानशिवाय एकही फलंदाज चालला नाही, त्यामुळे पाकिस्तानचा दुसरा डाव केवळ 146 धावांवर आटोपला. मेहदी हसन मिराज आणि शकिब अल हसन यांच्या घातक गोलंदाजीपुढे पाकिस्तानचे फारकाळ फलंदाज टिकू शकले नाहीत. पाककडून फलंदाजीत अब्दुल्ला शफीकने 37, बाबर आझमने 22 आणि कर्णधार शान मसूदने 14 धावा केल्या. मोहम्मद रिझवानने पुन्हा एकदा स्थिरावण्याचा प्रयत्न केला पण 51 धावा केल्यानंतर माघारी परतला. मात्र, संघाचा पराभव टाळण्यासाठी हे पुरेसे नव्हते. दरम्यान, बांगलादेशकडून दुसऱ्या डावात मिराजने सर्वाधिक चार तर शकिबने तीन बळी घेतले. शरीफुल, हसन आणि नाहिद यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
विजयासाठीचे 30 धावांचे लक्ष्य बांगलादेशच्या झाकीर हसन आणि शदमाम इस्लामच्या जोडीने एकही विकेट न गमावता पूर्ण केले. झाकीर 15 धावांवर तर शदमाम नऊ धावांवर नाबाद राहिला. या सामन्यात पाकिस्तानचा संघ फिरकीपटूविना मैदानात उतरला होता. त्यामुळे संघाला तोटा सहन करावा लागला. बांगलादेशच्या फिरकीपटूंनी दुसऱ्या डावात धुमाकूळ घातला, तर त्याचा फटका पाकिस्तानला सहन करावा लागला.





