ENG vs SL 1st Test : इंग्लंडचा यष्टिरक्षक जेमी स्मिथने रचला इतिहास, मोडित काढला 94 वर्षे जुना विक्रम…

ENG vs SL 1st Test (Jamie Smith Record) : इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात एका युवा प्रतिभावान फलंदाजाने आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले आहे. आम्ही बोलत आहोत इंग्लंडचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज जेमी स्मिथबद्दल. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जेमी स्मिथने आपला चौथा सामना खेळताना शानदार शतक झळकावले आहे. सहाव्या क्रमांकावर आलेल्या या फलंदाजाने 148 चेंडू खेळले आणि 8 चौकार आणि 1 षटकार मारत 111 धावा केल्या. यासह त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला, ज्यामध्ये त्याने इंग्लंडच्या महान फलंदाजांना मागे टाकले आहे.
जेमी स्मिथने केला एक विक्रम
जेमी स्मिथ इंग्लंडसाठी कसोटी शतक झळकावणारा सर्वात तरुण यष्टिरक्षक ठरला. स्मिथने वयाच्या अवघ्या 24 वर्षे 40 दिवसांत हा पराक्रम केला. त्याने इंग्लंडचा माजी दिग्गज लेस्ली एथेलबर्ट जॉर्ज एम्स यांचा विक्रम मोडला. ज्यांनी 1930 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हा विक्रम केला होता. त्यावेळी त्यांचे वय 24 वर्षे 60 दिवस होते. एम्सने हा विक्रम 1930 मध्ये दोनदा केला होता. किंग्स्टनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यांनी दुसऱ्यांदा हा विक्रम केला. त्यावेळी त्यांचे वय 24 वर्षे 121 दिवस होते.
Jamie Smith is the youngest wicketkeeper to score a Test hundred for England 🤩 #ENGvSL pic.twitter.com/YWudOTJYZK
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 23, 2024
कमी वयात शतक ठोकण्याचा विक्रम करणारे फलंदाज..
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा विक्रम बांगलादेशचा फलंदाज मोहम्मद अश्रफुलच्या नावावर आहे. हा विक्रम त्याने 2001 मध्ये कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध केला होता. त्यावेळी अश्रफुलचे वय अवघे 17 वर्षे 61 दिवस इतके होते. पाकिस्तानचा फलंदाज मुश्ताक मोहम्मद दुसऱ्या स्थानावर आहे. 1961 मध्ये दिल्लीत त्यांनी वयाच्या 17 वर्षे 78 दिवसांत ही कामगिरी केली होती. या यादीत महान फलंदाज सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने हा विक्रम 1990 मध्ये मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध केला होता. त्यावेळी त्यांचे वय अवघे 17 वर्षे 107 दिवस इतके होते.
दरम्यान, इंग्लंडने पहिल्या डावात श्रीलंकेला 236 धावांत गुंडाळले होते. यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लिश संघाने 358 धावा करत 122 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या श्रीलंकेने 10 धावांच्या आतच दोन विकेट गमावल्या आहेत. आज तिसऱ्या दिवसाचा खेळ चालू असून या सामन्याचा निकाल काय लागतो हे पाहणे बाकी आहे.





