Bangladesh Violence । Shekh Haseena: शेख हसीना यांच्या अडचणी वाढल्या; हत्येची आणखी ४ प्रकरणे

bangladesh violence – बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात हत्येची आणकी ४ प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. हसीना यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील काही माजी मंत्री आणि काही सहकाऱ्यांविरोधात ही प्रकरणे दाखल केली गेली आहेत.
हसीना, बॉर्डर गार्ड बांगलादेशचे माजी महासंचालक जनरल अझिझ अहमद आणि अन्य ११ जणांविरोधात बांगलादेश रायफल्सचे तत्कालिन अधिकारी अदूर रहिम यांच्या २०१० मध्ये झालेल्या मृत्यूबद्दल हत्येचे प्रकरण दाखल केले गेले आहे.
रहिम हे २०१० मध्ये बांगलादेश रायफल्सचे डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर होते. पिलखाना येथे २०१० मध्ये झालेल्या नरसंहाराच्या प्रकरणात ते आरोपी होते. त्याच वर्षी २९ जुलै रोजी तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला होता. रहिम यांच्या मुलाने ढाका महानगर दंडाधिकाऱ्यांकडे याबाबतचे प्रकरण दाखल केले आहे.
विद्यार्त्यांच्या आंदोलनादरम्यान मिलिटरी इन्स्टिट्युट ऑफ सायन्स ऍन्ड टेक्नोलॉजीच्या एका विद्यार्थ्याच्या हत्येसंदर्भात हसीना आणि अन्य ४८ जणांविरोधात आणखी एक प्रकरण दाखल झाले आहे. न्यायालयाने हे प्रकरण दाखल करून घेऊन संबंधितांचे जबाब नोंदवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
या प्रकरणी आवामी लीगचे सरचिटणीस आणि माजी महामार्ग मंत्री ओबेदुल कैदर आणि माजी गृहमंत्री असादुझ्झमान खान यांना अरोपी केले गेले आहे. एका विक्रेत्याच्या हत्येचेही एक प्रकरण हसीना आणि अन्य २७ जणांविरोधात दाखल केले गेले आहे. तर हसीना आणि अन्य २५ जणांविरोधात एका रिक्षा चालकाच्या हत्येचेही प्रकरण दाखल केले गेले आहे.





