Bangladesh violence: शेख हसीनांच्या अडचणींत सातत्याने होतेय वाढ; आणखी एक गुन्हा दाखल

Bangladesh violence | Sheikh Hasina – बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नसून त्यात सातत्याने वाढच होते आहे. देश सोडून पळ काढावा लागलेल्या शेख हसीना यांना आता बांगलादेशातील आंदोलनात बळी पडलेल्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले जाते आहे. त्यांच्यावर हत्येचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हसीना आणि त्यांच्या सरकारमधील अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नरसंहार, हत्या आणि शोषणाचे आरोप करत त्यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाकडे अर्थात आयसीटीकडे आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात आयसीटीकडे करण्यात आलेली ही दुसरी तक्रार आहे.
बांगलादेशात जेंव्हा निदर्शने सुरू होती तेंव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्याचे पिता मोहम्मद सनाउल्लाह यांनी तक्रार दाखल केली आहे.
२० जुलै रोजी आंदोलकांवर झालेल्या गोळीबारात सनाउल्लाह यांचा एकुलता एक मुलगा मेहेदी हसन याचा मृत्यू झाला होता. मेहेदी याच्या डोक्यात गोळी लागली होती आणि तो जागेवरच कोसळला होता.
दरम्यान, आयसीटीने दाखल तक्रारींवरून शेख हसीना आणि अन्य १० जणांच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात एका तपास अधिकाऱ्याची नियुक्तीही करण्यात आली असल्याचे तक्रारकर्त्याच्या वकिलाने सांगितले.
शेख हसीना यांच्या विरोधात या अगोदर बुलबुल कबीर यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांचा मुलगा आरिफ अहमद सियाम याचाही आंदोलनाच्या काळात मृत्यू झाला आहे.





