Bangladesh Crisis : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद भारतात; केकेआरसह आयपीएलवर बहिष्काराचा इशारा

Bangladesh Crisis affect IPL 2026 : बांगलादेशात आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून, तेथील अल्पसंख्याक समुदायाला, विशेषतः हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. गेल्या दोन आठवड्यांत दीपू चंद्र दास आणि अमृत मोंडल या दोन हिंदू तरुणांची जमावाने निर्घृण हत्या (लिंचिंग) केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या हिंसक घटनांचे तीव्र पडसाद आता भारतात उमटू लागले असून, याचे सावट आगामी आयपीएल (IPL) हंगामावर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धार्मिक नेत्यांचा संताप आणि खेळपट्टी उखडण्याचा इशारा –
बांगलादेशातील अत्याचारांच्या निषेधार्थ दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू संघटनांनी आधीच तीव्र निदर्शने केली आहेत. आता या वादात धार्मिक नेत्यांनीही उडी घेतली आहे. उज्जैनमधील रिणमुक्तेश्वर महादेव मंदिराचे मुख्य पुजारी महावीर नाथ यांच्यासह काही साधूंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “एकीकडे बांगलादेशात हिंदूंचा छळ होत असताना दुसरीकडे त्यांच्या क्रिकेटपटूंना भारतात खेळण्याची परवानगी देऊ नये,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुस्तफिजूर रहमानमुळे केकेआर निशाण्यावर –
इतकेच नव्हे तर, बांगलादेशी खेळाडू मैदानात उतरल्यास ‘धार्मिक योद्धे’ मैदानावर चाल करतील आणि खेळपट्टी उखडून टाकतील, असा थेट इशारा महावीर नाथ यांनी दिला आहे. आयपीएल २०२५ च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला ९.२० कोटी रुपयांची मोठी बोली लावून संघात घेतले आहे. मात्र, बांगलादेशातील सद्यस्थिती पाहता सोशल मीडियावर केकेआर संघावर बहिष्काराचे आवाहन केले जात आहे.
हेही वाचा – AUS vs ENG : इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी विजयाने भारताची वाढली डोकेदुखी, नेमकं समीकरण काय?
मुस्तफिजूरने आतापर्यंत आयपीएलमध्ये ६० सामन्यांत ६५ विकेट्स घेतल्या असून तो एक अनुभवी खेळाडू मानला जातो.मात्र, सध्याच्या तणावामुळे त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशात निवडणुका होणार असून त्यापूर्वी उसळलेल्या या हिंसाचारामुळे तेथील कोट्यवधी अल्पसंख्याक भीतीच्या छायेखाली आहेत. भारतातून होणारा हा वाढता विरोध पाहता बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





