AUS vs ENG : इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी विजयाने भारताची वाढली डोकेदुखी, नेमकं समीकरण काय?

AUS vs ENG England beat Australia 4th Test : मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडलेल्या ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ४ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. सहसा ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व असणाऱ्या या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत इंग्लंडने दोन दिवसांतच निकाल लावत यजमानांना धूळ चारली. या विजयासह इंग्लंडने मालिकेत १-३ ने पुनरागमन केले असले तरी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत मात्र रंजक स्थिती निर्माण झाली आहे.
इंग्लंडचा १४ वर्षांनी ऑस्ट्रेलियात कसोटी विजय –
१७५ धावांच्या लक्ष्याला उत्तर देताना इंग्लंडने दमदार सुरुवात केली. झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी ५१ धावा जोडल्या. झॅक क्रॉलीने ३७ धावा आणि बेन डकेटने ३४ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या मालिकेत इंग्लंडच्या सलामी जोडीची ही पहिली अर्धशतकी भागीदारी होती. त्यानंतर जेकब बेथेलने शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यामुळे इंग्लंडला १४ वर्षांनी ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकता आला. यापूर्वी २०११ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर हरवले होते.
ऑस्ट्रेलियाचे अव्वल स्थान अबाधित –
या पराभवापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ २०२५-२७ च्या चक्रात सलग विजयांसह १०० टक्के सरासरी राखून अव्वल स्थानी होता. इंग्लंडविरुद्धच्या या पराभवामुळे त्यांच्या विजयाची सरासरी ८५.७१ टक्के झाली आहे. मात्र, इतकी घट होऊनही ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी कायम आहे. सध्याची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.
हेही वाचा – Mahbub Ali Zaki : धक्कादायक! क्रिकेट विश्वावर पसरली शोककळा; सामन्यापूर्वीच मैदानात कोचचं हृदयविकाराने निधन
इंग्लंडच्या विजयाने भारताची डोकेदुखी वाढली –
दुसरीकडे, या विजयानंतर इंग्लंडच्या खात्यात १२ गुण जमा झाले आहेत. इंग्लंडचा संघ सध्या ३५.१७ टक्के सरासरीसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. विशेष म्हणजे, या निकालाचा भारतीय संघाच्या क्रमांकावर कोणताही परिणाम झालेला नाही. भारतीय संघ ४८.१५ टक्के सरासरी आणि ५२ गुणांसह सहाव्या स्थानी स्थिर आहे. मात्र, जर इंग्लंडने सिडनी येथील शेवटचा सामना जिंकला, तर ते भारताला मागे टाकू शकतात. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे.
पुढील लक्ष्य: सिडनी कसोटी –
ॲशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ४ जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाईल. ऑस्ट्रेलिया सध्या मालिकेत ३-१ ने आघाडीवर असून त्यांचा प्रयत्न मालिका ४-१ ने जिंकण्याचा असेल. तर, मेलबर्नमधील विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला इंग्लंडचा संघ ही मालिका ३-२ अशा सन्मानजनक फरकाने संपवण्यासाठी मैदानात उतरेल. डब्ल्यूटीसीच्या फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आगामी सिडनी कसोटी दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.





