Asia Cup 2025 : बांगलादेशचा आशिया कपसाठी १६ सदस्यीय संघ जाहीर! ‘हा’ खेळाडू तीन वर्षांनी परतला

Bangladesh Squad For Asia Cup 2025 : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 9 सप्टेंबरपासून युएईमध्ये होणाऱ्या आशिया कप 2025 साठी आपल्या 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यष्टिरक्षक-फलंदाज लिटन दास याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. लिटनच्या नेतृत्वाखाली बांगलादेश संघाने अलीकडेच उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आशिया कपपूर्वी बांगलादेश संघ 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान नेदरलँड्सविरुद्ध घरी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.
काजी नुरुल हसनचे तीन वर्षांनंतर संघात पुनरागमन –
आशिया कप 2025 साठी निवडलेल्या 16 सदस्यीय बांगलादेश संघात 31 वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज काजी नुरुल हसन सोहन याला तीन वर्षांनंतर संधी देण्यात आली आहे. नुरुल हसनने अखेरचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 2022 च्या टी-20 विश्वचषकात खेळला होता. माजी कर्णधार नजमुल हुसैन शांतो याला या संघात स्थान मिळालेले नाही. तसेच, प्रभावी गोलंदाज मेहदी हसन मिराजला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मुस्तफिजुर रहमान आणि तस्किन अहमद यांच्यावर असेल.
हाँगकाँगविरुद्ध खेळणार पहिला सामना –
बांगलादेश संघाला आशिया कप 2025 मध्ये ग्रुप-बी मध्ये स्थान मिळाले आहे, ज्यामध्ये अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. ग्रुप-बी मध्ये असलेला बांगलादेश संघ आपला पहिला सामना 11 सप्टेंबर रोजी हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध दुसरा सामना होईल, तर ग्रुप-बी मधील शेवटचा सामना 16 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळला जाईल.
आशिया कप 2025 साठी बांगलादेश संघ:
लिटन दास (कर्णधार), तंझिद हसन, परवेझ हुसैन इमोन, सैफ हसन, तौहिद हृदयोय, जाकेर अली, शमीम हुसैन, काजी नुरुल हसन सोहन, शक महेदी हसन, रिशाद हुसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंझिम हसन साकिब, तस्किन अहमद, शोरफुल इस्लाम, शैफ उद्दीन. राखीव खेळाडू: सौम्या सरकार, मेहदी हसन मिराज, तन्वीर इस्लाम, हसन महमूद.





