Cricket : बांगलादेशला एका महिन्यात 2 मोठे धक्के, शकिब-अल-हसननंतर ‘या’ स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा…

IND vs BAN T20 Series (Mahmudullah Riyad Retirement) : अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून फक्त 2 आठवडे झाले आहेत. आता त्याच्यानंतर बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू महमुदुल्लाहने मंगळवारी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि भारताविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा टी-20 फॉरमॅटमधील त्याचा शेवटचा सामना असेल.
बांगलादेश क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दुसरा टी-20 सामना बुधवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर तर तिसरा व अखेरचा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच बांगलादेश क्रिकेट संघाला मालिकेदरम्यान महमुदुल्लाहच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे मोठा धक्का बसला आहे.
🗣️ “I think it is the right time to move on from this format for me and the team. Especially with the World Cup coming up in less than two years. I will concentrate on the one-day game”
Mahmudullah has confirmed his retirement from T20Is after the series against India pic.twitter.com/Gf7zb3MJpi
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 8, 2024
महमुदुल्लाहने भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पूर्वसंध्येला दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, “होय, या मालिकेतील शेवटच्या सामन्यानंतर मी टी-20 मधून निवृत्त होत आहे आणि हे आधीच ठरलेले होते. या फॉरमॅटमधून पुढे जाण्याची आणि वनडेवर लक्ष केंद्रित करण्याची हीच योग्य वेळ आहे. ”
महमुदुल्लाहने टी-20 विश्वचषक 2024 नंतर एकही टी-20 सामना खेळलेला नाही, परंतु 6 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या मालिकेत त्याने पुनरागमन केले आहे. मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरच्या माधवराव सिंधिया स्टेडियमवर खेळला गेला. महमुदुल्लाला या सामन्यात विशेष काही करता आले नाही. त्याने 2 चेंडूंचा सामना करत 1 धाव काढली. तसेच महमुदुल्लाहने गोलंदाजीत हात आजमावला नव्हता.
38 वर्षीय खेळाडूने 2007 मध्ये पदार्पण केल्यापासून बांगलादेशकडून 50 कसोटी, 232 एकदिवसीय आणि 139 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. बांगलादेशच्या या माजी टी-20 कर्णधाराने 2021 मध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीला निरोप दिला होता. जर आपण त्याच्या टी-20 क्रिकेटमधील कारकिर्दीवर नजर टाकली तर, अष्टपैलूची भूमिका बजावत, त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 139 सामने खेळले, ज्यामध्ये त्याच्या नावावर 2,395 धावा आहेत. त्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 40 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने जवळपास 17 वर्षे T20 क्रिकेटमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे





