दखल: पबजी गेमवर बंदी अत्यावश्‍यक

अशोक सुतार

भारतात पबजी खेळणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. घराघरांत पबजी खेळणारी मुले असून परीक्षा जवळ आल्यामुळे पबजीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी जम्मू-काश्‍मीरमधील विद्यार्थी संघटनेने राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे नुकतीच केली आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. दिवसभर पबजी खेळणाऱ्यांमध्ये महाविद्यालयीन युवकांचा जास्त समावेश आहे. परीक्षेच्या काळात पबजीवर बंदी घातली नाही तर अनेक मुले नापास होतील, अशी भीती व्यक्‍त होत आहे. पबजी गेममुळे मुलांचे भविष्य बिघडत आहे. या गेमवर तत्काळ बंदी घालण्यात यावी, असे जम्मू-काश्‍मीर विद्यार्थी युनियनचे अध्यक्ष अबरार अहमद यांनी मागणी केली आहे. पबजी गेम हा ड्रग्जपेक्षाही धोकादायक समजला जातो. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्‍मीरमध्ये सतत 10 दिवस पबजी गेम खेळल्याने एका फिटनेस ट्रेनरचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पबजीच्या अतिरेकामुळे मानसिक स्थिती बिघडल्याचे हे जम्मू-काश्‍मीरमधील पहिले उदाहरण नाही. याआधी अशा प्रकारच्या सहा घटना समोर आल्या आहेत. या घटनेनंतर पुन्हा जम्मू-काश्‍मीरमध्ये तसेच देशात पबजीवर बंदी घालण्याच्या मागणीने जोर धरला आहे. पबजी मोबाइल गेमचे अनेक दुष्परिणाम समोर येत असतानाही हा गेम खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

जगभरात अनेक ठिकाणी पबजी चॅलेंज टूर्नामेंट होत असून पबजी खेळणारे लाखो रुपये कमावत आहेत. भारतातही 21 जानेवारीपासून ओप्पो पबजी मोबाइल इंडिया सीरिज 2019 सुरू होत आहे. ही टूर्नामेंट मार्च महिन्यापर्यंत चालणार असून गेम खेळणाऱ्यांना लाखो रुपये जिंकण्याची संधी आहे. एवढेच काय, कराडसारख्या शहरात शिवाजी स्टेडिअमवर 15 डिसेंबर 2018 दरम्यान पबजी गेमच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यासाठी 10 हजार रुपयांचे पहिले बक्षीस होते. मुंबई, पुणे येथे सदर स्पर्धा अनेकवेळा घेतल्या जातात. भारतात पबजी चॅलेंज टूर्नामेंटचे याआधीही आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी 50 लाखांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती. यावेळी कंपनीने बक्षिसांची रक्‍कम 1 कोटीपर्यंत वाढवली आहे.

सतत व्हिडिओ गेम खेळणे हे जीवावर बेतू शकते. लहानग्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या प्लेअर अननोन्स बॅटलग्राउंडस (झणइ) या गेमला आता शालेय मुले आणि युवकांमध्ये प्रसिद्धी मिळत आहे. अनेक लहान मुले या गेमच्या आहारी गेली असून, हिंसक कृत्यासाठीही प्रवृत्त होत असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणाईला प्रचंड आकर्षण असणाऱ्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तूच तरुणाईच्या ऱ्हासाचे कारण बनत आहेत.

इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांमधून अल्पावधीत मिळणारी लोकप्रियता आणि मिळकत यामुळे तरुण पबजी माध्यमांकडे आकर्षित होत आहे. पूर्वी मुले गप्पा मारण्यासाठी कट्ट्यावर किंवा एखाद्या चौकात जमायची; परंतु आता गप्पांसाठी हातात इंटरनेट नावाचे एक आयुध आले. परंतु त्याचा वापर विधायक कार्यासाठी होत नसल्याचे सध्या तरी दिसत आहे. कोणताही मीडिया हा काही चांगला किंवा वाईट नसतो. व्यक्‍ती आणि समूह त्याचा वापर कसा करतात यावर सारे अवलंबून असते. या सुविधांची उपयुक्‍तता व आवश्‍यकता याविषयी तरुणांनी विचार करणे गरजेचे आहे. इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांची आवश्‍यकता संपून त्यांच्या अधिन जाण्याचा धोका व त्याचे परिणाम समाज अनुभवत आहे. ही अधिनता सुविधांचे व्यसन लागेपर्यंत पोहोचलेली आहे.

तरुणांमध्ये सुदृढ मन, निर्णयक्षमता व व्यसनापासून स्वत:चे रक्षण करण्याची विवेक बुद्धी जागृत होणे आवश्‍यक आहे. पबजी गेममुळे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जागतिक आरोग्य विभागाने पबजी गेममुळे मानसिक आजार होत असल्याचे जाहीर केले आहे. एका रिपोर्टनुसार हा गेम संध्याकाळच्या वेळेत जास्त खेळला जातो. बंगळुरूच्या वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीने हॉस्टेलमध्ये पबजी खेळण्यावर बंदी घातली आहे. गेम खेळण्याचे प्रमाण वाढत आहे, तशी रुग्णांची संख्या वाढत आहे. पबजी या गेमची निर्मिती ब्ल्यूहोल कंपनीने केली आहे. या गेमचे मोबाइल व्हर्जन टेन्सेंट मोबाइल कंपनीने बाजारात आणले.

या गेमची जाहिरात आता टीव्हीवरही सुरू झाली आहे. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी, अनेक नोकरदार वर्ग, फावल्या वेळात गेम खेळताना दिसत आहेत. झोप विसरून रात्री दीड आणि दोन वाजेपर्यंतही गेम खेळला जात आहे. हा गेम खेळणारे अनेकजण मान आणि कंबरदुखीने ग्रस्त झाले आहेत. पबजी गेम येण्यापूर्वी ब्ल्यू व्हेल गेमने जगात खळबळ माजवली होती. ब्ल्यू व्हेल गेममुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अजूनही सदर गेमचे दुष्परिणाम दिसून येत आहे. सध्या पबजी गेमचा बोलबाला सुरू असून यात अनेक युवक गुरफटले आहेत. पुढील पिढीवर हे विकृतीचे आक्रमण झाले असताना ते थोपवण्यासाठी सरकारने, पालकांनी, सामाजिक संघटनांनी कठोर पावले उचलली पाहिजेत. अन्यथा नवी पिढी यात वाहवत जाईल, यात शंका नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.