Bajrang Sonawane : बजरंग सोनवणे यांची खासदारकी रद्द होणार? न्यायालयाची नोटिस; चार आठवड्यात उत्तर देण्याचे दिले आदेश….

Bajrang Sonawane | बीड लोकसभा मतदार संघातून पंकजा मुंडे यांचा पराभव करत शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला. त्यांनी पंकजा यांचा तब्बल 6 हजार 553 मतांनी पराभव केला होता. दरम्यान, सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.
आज या याचिकेवर न्यायमूर्ती ए. एस. वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यामुळे खंडपीठाने बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार प्रतिवादी बजरंग सोनवणे यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे. यावेळी काही मतदान केंद्रावरील मतांवर आक्षेप घेण्यात आला आहे.
माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, नारायण शिरसाट यांनी ॲड. शशिकांत ई शेकडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.
पोलिंगबुथ केंद्राची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणे गरजेचे असताना सुद्धा निवडणुकीच्या तीन दिवस अगोदर पॉलिंग बूथ केंद्र वाढवले असून त्यामुळे 4 हजार 261 लोक मतदानापासून वंचित राहिलेले आहेत. ते बूथ कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत.
तसेच सदरील पोलिंग बूथचे मतदान मतमोजणी करताना मोजता येणार नाहीत. असा उल्लेख यावेळी करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता बजरंग सोनावणे यांना चार आठवड्याची मुदत देत उत्तर देण्याचे आदेश दिले आहे.
मनोज जरांगे फॅक्टरचा बजरंग सोनवणेंना फायदा?
बीडमध्ये मनोज जरांगे फॅक्टर जाणवल्याचे दिसून आले आहे. ऐन निवडणुकांत ओबीसी विरुद्ध मराठा या वादाने बीड लोकसभा मतदारसंघात चांगलाच जोर धरला होता. त्याचा थेट फायदा बजरंग सोनवणे यांना झाल्याचं दिसून येत आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातील अनेक जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याच्या चर्चा आहेत. भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना ३२ व्या फेरीत तब्बल साडेसहा हजार मताधिक्यांनी पराभवाचा सामना करावा लागला.





