Satara | शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी बहुजनांनी पुढे यायला पाहिजे

सातारा, (प्रतिनिधी) – सरकार व लोकप्रतिनिधींची शिक्षण व्यवस्थेबद्धल प्रचंड अनास्था आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व पालकांपर्यंत सध्याच्या शिक्षण व्यवस्थेची परिस्थिती पोहचवायला हवी.
कुठल्याही आंदोलनाला बहुजनांचा पाठिंबा मिळाल्यास तो यशस्वी होणार, ही खूणगाठ मनाशी बांधून शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी बहुजनांनी पुढे यायला पाहिजे, असे परखड मत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, पुणेचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचे वार्षिक अधिवेशन दि. 30 जुलै रोजी लिंब-गोवे (सातारा) येथील श्री कोटेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रागंणात पार पडले.
यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाहक माजी शिक्षक आमदार विजय गव्हाणे, अध्यक्ष आप्पासो बालवडकर, राज्य प्रयोगशाळा परिचर महासंघाचे अध्यक्ष भरत जगताप, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलवडे,
वसंतराव फाळके, अमरसिंह पाटणकर, स्वागताध्यक्ष आनंदराव जाधव मोहनराव जाधव, डी. के. जाधव, अनिरुद्ध गाढवे, एस. टी. सुकरे यांची विशेष उपस्थिती होती.
श्री. थोरात म्हणाले, शिक्षणातील समस्यांवर आमदारांना पत्रव्यवहार केला. परंतु, कुणीही सुचवलेल्या विषयावर विचार करतोय, असे कळवायचे धारिष्ट दाखवले नाही. यावरुन त्यांची शिक्षणावर असणारी तळमळ दिसून येते. शिक्षणाच्या होणाऱ्या बाजारीकरणातून बहुजनांना जोडण्याचा नव्हे,
तर तोडण्याचा प्रयत्न सरकार करत असून शिक्षणक्षेत्र वाचवण्यासाठी बहुजनांनी सरकारला व विरोधकांना धारेवर धरले पाहिजे, असे आवाहन करून 6 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात सर्व शिक्षण संस्थांनी व शिक्षणप्रेमी पालकांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विजय गव्हाणे म्हणाले, शिक्षण व्यवस्था बरबाद करण्याचे धोरण शासनाने हाती घेतले आहे. गावातील शाळा बंद करणे, मुख्याध्यापक, कर्मचारी पदे काढणे, शिक्षकेतर सेवक कपात, आर.टी.ई धोरणांना तिलांजली देऊन गरिबांच्या मुलांना शिक्षण नाकारणे, कंत्राटी भरतीचा रद्द केलेला जी. आर. पुन्हा नवीन आदेश काढून सत्ताधारी सरकार 6 हजार 400 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचे बोलते.
यावरून मराठा, ओबीसी, एस.सी, एस.टी, तसेच गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे आहे. कारण, कंत्राटी पद्धतीमध्ये कोणालाही आरक्षण मिळणार नाही. यातून फक्त शिक्षणाचा व्यवहार होत आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांनी शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे.
यावेळी एस. टी. सुकरे, सचिन नलवडे, भरत जगताप यांची भाषणे झाली. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी कोटेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव तुकाराम जाधव, संचालक भुजंगराव जाधव, उपाध्यक्ष नामदेवराव जाधव, प्राचार्या विभा साबळे, सर्व संचालक मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. अधिवेशनास सातारा जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, पालक उपस्थित होते.
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण क्षेत्रावर कुटील डाव
मागील सरकारने स्वयंअर्थसहाय्यीत शाळा सुरू केल्या, तसेच 52 हजार शिपाई पदे कमी केली. आता पवित्र पोर्टल आणून सरकारने शिक्षण क्षेत्रावर कुटील डाव टाकला आहे.
परंतु, दुर्दैवाने विरोधकांच्या किंवा कुठल्याही आमदारांच्या अजेंड्यावर शिक्षण हा विषयच नाही. अशाने गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचे कसे होणार? असा प्रश्न उपस्थित करून शिक्षणाचा विषय आपण सर्वांनी अजेंड्यावर आणायला लावला पाहिजे, असेही मत स्पष्ट अशोकराव थोरात यांनी मांडले.





