हिंगोली: भंडारी गावाजवळील पूल खचल्याने शालेय विद्यार्थिनींची बस सेवा ठप्प; शैक्षणिक नुकसान

सेनगाव – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील भंडारी ते खडकी रस्त्यावरील भंडारी गावाजवळील ओढ्याचा पूल मागील आठवड्यापासून सततच्या पावसामुळे खचला आहे. यामुळे मानव विकास योजनेअंतर्गत चालणारी शालेय विद्यार्थिनींसाठीची बस सेवा बंद झाली आहे. परिणामी, घोत्रा, बोरखडी, पिनगाळे, होलगिरा, हिवरखेडा या गावांतील सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांना गेल्या दहा दिवसांपासून शाळेत जाणे शक्य होत नाही. यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
गेल्या आठवड्यापासून हिंगोली जिल्ह्यात ढगफुटीसदृश पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल खचले असून, सेनगाव तालुक्यातील भंडारी गावाजवळील ओढ्याचा पूलही याला अपवाद नाही. पावसाच्या पाण्याने मुरूम वाहून गेल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत, तर वाहून गेलेले मुरूम शेतकऱ्यांच्या शेतात जमा होऊन शेतीचेही नुकसान होत आहे.
हिवरखेडा येथील ग्रामस्थांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. बोरखडी आणि पिनगाळे येथील पुलाच्या बाजूच्या साइड पट्ट्याही पूर्णपणे खचल्या असून, येथे तातडीने दुरुस्ती आणि भराव टाकण्याची गरज आहे.
ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भंडारी येथील पूल तात्काळ दुरुस्त करून बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत पूल दुरुस्त होत नाही, तोपर्यंत विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान थांबणार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.





