Bahujan Vikas Aaghadi : हितेंद्र ठाकुर यांच्या वर्चस्वाला धक्का, ३५ वर्षांपासूनच्या सत्तेला सुरूंग….

मुंबई – वसई-विरारमध्ये गेल्या 35 वर्षांपासून एकहाती सत्ता राखणाऱ्या बहुजन विकास आघाडीला यंदा मोठा धक्का बसला आहे. वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीच्या विद्यमान आमदारांचा पराभव झाला आहे. हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितीज ठाकूर यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. वसई विधानसभेत हितेंद्र ठाकूर यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर क्षितीज ठाकूर यांनाही नालासोपारा विधानसभेत हार पत्करावी लागली.
वसई मतदारसंघातून तीन वेळा विजयी झालेले हितेंद्र ठाकूर यांना यंदा वसईच्या जनतेने नाकारले. भाजपाच्या स्नेहा दुबे-पंडीत यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला आहे. ठाकूर कुटुंबाची ही पराभवाची पहिलीच वेळ आहे. वसई-विरारच्या जनतेने दिलेला हा निकाल संपूर्ण वसई-विरारसाठी धक्कादायक ठरला आहे.
नालासोपारामध्ये भाजपाचे राजन नाईक यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांचा पराभव भाजपाचे राजन नाईक यांनी केला. राजन नाईक यांनी विजयाच्या क्षणी कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाची आठवण करून देत भावनिक भाषण दिलं.
Jharkhand Elections 2024 : झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचे जोरदार कमबॅक, भाजपला जोरदार धक्का….
बोईसरमध्ये विद्यमान आमदार राजेश पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे विजयी झाले आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे त्यांचा मतदार विभागला गेला. यावेळी येथील जनतेने बहुजन वंचित आघाडीकडे पाठ फिरवली आणि सत्ता पालट केला. या पराभवाने बहुजन विकास आघाडीची वसई-विरारमधील मक्तेदारी संपली असून भाजप आणि शिंदे गटाने येथे आपली पकड मजबूत केल्याचं दिसत आहे. वसई, विरारमध्ये बहुजन वंचित आघाडीचा दारुण पराभव झाला आहे.





