Assembly election 2023 : छत्तीसगडसाठी बसपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

रायपूर :- बहुजन समाज पक्षाने आगामी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाच्या विद्यमान दोन आमदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
कॉंग्रेसशासित छत्तीसगडमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत, तथापि निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या निर्देशानुसार, काल रात्री ही नऊ जणांची पहिली यादी जाहींर झाली आहे.
आमदार केशव प्रसाद चंद्र आणि इंदू बंजारे,यांना पुन्हा आपापल्या विभागातून रिंगणात उतरवण्यात आले आहे.यादीतील अन्य उमेदवारांमध्ये दौराम रत्नाकर (मस्तुरी -अनुसूचित जातींसाठी राखीव), ओमप्रकाश बच्पेयी (नवागढ-एससी राखीव), राधेश्याम सूर्यवंशी (जांजगीर-चंपा), डॉ. विनोद शर्मा (अकलतारा), श्याम टंडन (बिलाईगड) रामकुमार सूर्यवंशी (बेलतारा) आणि आनंद तिग्गा (सामरी) यांचा समावेश आहे.
या राज्यात बहुजन समाजपक्षाने गेल्या वेळची विधानसभा निवडणूक जनता कॉंग्रेस छत्तीसगड आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाबरोबर युती करून लढवली होती.या पक्षाला गेल्यावेळी दोन जागांवरच समाधान मानावे लागले होते. त्यावेळी त्यांना एकूण 4.27 टक्के मते मिळाली होती.





