मायावतींनी पुतण्या आकाशची पक्षातून केली हकालपट्टी; 15 महिन्यांत दोनदा उत्तराधिकारी बनवले आणि हटवले

BSP News: बसपा प्रमुख मायावती यांनी सोमवारी त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांची पक्षातून हकालपट्टी केली. मायावती म्हणाल्या, आकाशला पश्चाताप करून परिपक्वता दाखवायची होती मात्र त्याने दिलेली प्रतिक्रिया ही राजकीय परिपक्वता नाही. सासऱ्याच्या प्रभावाखाली तो स्वार्थी आणि अहंकारी झाला आहे. एका दिवसापूर्वी, बसपा सुप्रिमो मायावती यांनी आकाशला सर्व पक्षीय पदांवरून हटवले होते आणि तो त्यांचा उत्तराधिकारी नसल्याचे सांगितले होते.
मायावती म्हणाल्या, ‘माझ्या हयातीत आणि शेवटच्या श्वासापर्यंत पक्षात माझा कोणीही वारसदार नाही. माझ्यासाठी पक्ष आणि चळवळ प्रथम, कुटुंब आणि नातेसंबंध दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मी जिवंत असेपर्यंत पूर्ण प्रामाणिकपणे पक्षाला पुढे नेत राहीन.’
15 महिन्यांत दोनदा उत्तराधिकारी बनवले –
आकाश हे मायावतींच्या धाकट्या भावाचा मुलगा आहे. त्यांना 15 महिन्यांत दोनदा त्यांचा उत्तराधिकारी घोषित करण्यात आले, परंतु दोन्ही वेळा त्यांना काढून टाकण्यात आले. 10 डिसेंबर 2023 रोजी प्रथम उत्तराधिकारी बनले होते. 7 मे 2024 रोजी चुकीचे वक्तव्य केल्यामुळे आकाश यांच्याकडील सर्व जबाबदाऱ्या काढून घेण्यात आल्या होत्या.
23 जून 2024 रोजी त्यांना पुन्हा त्यांचे उत्तराधिकारी बनवण्यात आले आणि राष्ट्रीय समन्वयक म्हणून जबाबदारीही सोपवण्यात आली. मात्र 2 मार्च 2025 रोजी पुन्हा त्यांच्याकडून सर्व जबाबदाऱ्या काढून घेण्यात आल्या. 3 मार्च रोजी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मायावतींनी 3 ट्विटद्वारे दिली माहिती –

आकाश म्हणाला होता – बहणजींचा निर्णय दगडावरची रेष
बसपाच्या सर्व पदांवरून हटवल्यानंतर आकाश म्हणाला होता, ‘बहणजींचा प्रत्येक निर्णय माझ्यासाठी दगडावरच्या रेषेसारखा आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयाचा मी आदर करतो. मी त्यांच्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी आहे. परीक्षा कठीण आहे आणि लढा लांब आहे. बहुजन मिशन आणि चळवळीचा सच्चा कार्यकर्ता या नात्याने मी पक्ष आणि मिशनसाठी पूर्ण निष्ठेने काम करत राहीन. माझ्या समाजाच्या हक्कासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन.
मायावतींनी 2 मार्च रोजी आकाशकडून सर्व पदे काढून घेतली –
रविवारी, 2 मार्च रोजी मायावती यांनी लखनऊमध्ये बसपा कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत सांगितले होते, ‘मला सांगायचे आहे की आता आम्ही आमच्या मुलांचे नाते केवळ बिगर-राजकीय कुटुंबांमध्ये स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. बसपा सुप्रिमोने 16 फेब्रुवारी रोजी पुतण्या आकाशला अल्टिमेटम दिला होता. त्या म्हणाल्या होत्या, ‘बसपचा खरा वारस तोच असेल जो कांशीरामांप्रमाणे प्रत्येक दुःख-कष्ट सहन करतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत पक्षासाठी मनापासून लढतो आणि पक्षाची चळवळ पुढे नेत असतो.’
मायावती यांनी 18 दिवसांपूर्वी आकाशचे सासरे सिद्धार्थ यांची पक्षातून हकालपट्टी केली होती –
18 दिवसांपूर्वी, 12 फेब्रुवारीला मायावतींनी पुतण्या आकाशचे सासरे अशोक सिद्धार्थ आणि त्यांचे जवळचे सहकारी नितीन सिंह यांचीही पक्षातून हकालपट्टी केली होती. संघटनेतील गटबाजी आणि अनुशासनहीनतेवरून ही कारवाई करण्यात आली. त्या म्हाणाल्या होत्या, दक्षिणेकडील राज्यांचे प्रभारी असलेले डॉ. अशोक सिद्धार्थ आणि नितीन सिंग इशाऱ्यांनंतरही पक्षात दुफळी निर्माण करत होते. पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपटट्टी करण्यात येत आहे.
आकाशने 2017 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता –
2017 मध्ये सहारनपूरमधील एका जाहीर सभेत आकाश आनंद पहिल्यांदा मायावतींसोबत दिसले होते. त्यानंतर ते सातत्याने पक्षाचे काम करत होते. 2019 मध्ये त्यांना राष्ट्रीय समन्वयक बनवण्यात आले. लोकसभा निवडणुकीनंतर सपा आणि बसपची युती तुटल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 2022 च्या हिमाचल विधानसभा निवडणुकीत आकाश आनंदचे नाव पहिल्यांदाच स्टार प्रचारकांच्या यादीत दिसले.

आकाशने लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) चे शिक्षण घेतले आहे. आकाश यांचे लग्न बसपाचे माजी राज्यसभा सदस्य अशोक सिद्धार्थ यांची मुलगी डॉ. प्रज्ञासोबत झाले आहे.
आकाशच्या हकालपट्टीची असू शकतात ही तीन कारणं ?
दलित तरुणांमध्ये आकाशची वाढती लोकप्रियता-
बसपमध्ये मायावतींनी इतर कोणत्याही नेत्याला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू दिलेली नाही. बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्यानंतर मायावती यांनी पक्षात एकतर्फी निर्णय घेतले. स्वामी प्रसाद मौर्य, नसीमुद्दीन सिद्दीकी, ब्रजेश पाठक, लालजी वर्मा, राम अचल राजभर, बाबूसिंग कुशवाह, नकुल दुबे, लालजी निर्मल, केके गौतम, इंद्रजीत सरोज, सुनील चित्तोर, ब्रिजलाल खबरी यांसारखे नेते, ज्यांनी पक्षात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती, ते बाहेर फेकले गेले. तेच आकाशसोबत केले गेल्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत.
आकाशचे सासरे सिद्धार्थ गौतम यांना काढून टाकल्यानंतर कुटुंबात कलह –
खुद्द मायावतींनीच आकाशला लखनौ येथील पक्षाच्या मुख्यालयात संयोजक पदावरून हटवण्याचे कारण दिले. अशोक सिद्धार्थ यांच्याबाबत कुटुंबात किती कलह होता, हे यावरून स्पष्ट होते. त्या म्हणाल्या आकाशचे सासरे अशोक सिद्धार्थ यांनी पक्षाला दोन गटात विभागून यूपीसह संपूर्ण देशात दुफळी वाढवली होती. त्यांचे ‘अतिशय घृणास्पद कृत्य’ त्यांच्या हकालपट्टीचे कारण बनले. अशोक सिद्धार्थला बाहेर काढल्यानंतर तो आपल्या मुलीच्या माध्यमातून आकाशवर प्रभाव टाकत होता. आकाश आनंदची राजकीय कारकीर्द बिघडवण्यास त्याचे सासरे अशोक सिद्धार्थ पूर्णपणे जबाबदार आहेत. यामुळे कौटुंबिक कलह हेही कारण असू शकते.
मायावती काही दबावाखाली निर्णय घेत आहेत ?
मायावती गेल्या काही वर्षांपासून ज्याप्रकारे निर्णय घेत आहेत, ते पाहून त्यांचेच समर्थक आश्चर्यचकित झाले आहेत. मायावती या स्पष्टवक्त्या नेत्या मानल्या जातात, मात्र त्या काही काळापासून भाजपवर थेट हल्ला करण्याचे टाळत आहेत. त्या तुलनेत सपा-काँग्रेसबाबत त्यांची भूमिका आक्रमक आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुतण्या आकाश आनंदने भाजपवर हल्लाबोल सुरू करताच त्यांनी लगेचच त्याला गप्प केले. मायावती कोणाच्या तरी दबावाखाली किंवा प्रभावाखाली निर्णय घेत आहेत. कारण, आकाश वेगाने समाजावर प्रभाव टाकत होता. ते बसपाला पुढे नेऊ शकले असते. त्याला काढून टाकणे म्हणजे कुठेतरी तडजोड केली आहे, असेही बोलले जात आहे.





