Bahrain vs Hong Kong : अजबचं! टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडलं, सुपर ओव्हरमध्ये ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची झाली नोंद

Bahrain embarrassing record against Hong Kong in T20I super over : टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सुपर ओव्हरमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस तुम्ही पाहिला असेल. पण, तुम्ही कधी हे ऐकले आहे का? सुपर ओव्हरमध्ये एखाद्या संघाला एकही धाव करता आली नाही? बहरीन आणि हाँगकाँग यांच्यात झालेल्या सामन्यात हा अनोखा पराक्रम घडला. जिथे बहरीन संघ सुपर ओव्हरमध्ये एकही धाव करू शकला नाही. ज्यामुळे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बहरीन संघाच्या नावावर या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या १६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं –
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या १६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. वास्तविक, मलेशियामध्ये खेळल्या जाणाऱ्या तिरंगी मालिकेत हाँगकाँगचा सामना बहरीनशी झाला. प्रथम फलंदाजी करताना हाँगकाँगने ७ विकेट्स गमावून १२९ धावा केल्या. संघाकडून झीशान अलीने २९ आणि शाहिद वासिफने ३१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना बहरीनची सुरुवात चांगली झाली आणि प्रशांतने ३१ चेंडूत ३७ धावा केल्या.
बहरीन संघाचा सुपर ओव्हरमध्ये लाजिरवाणा विक्रम –
त्यानंतर कर्णधार अहमर बिन नासिर आणि इम्रान अन्वर यांनी चांगली फलंदाजी केली आणि संघाला लक्ष्याच्या जवळ पोहोचवले. यानंतर शेवटच्या षटकात बहरीनला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. बिनने पहिल्या दोन चेंडूंवर ४ धावा काढल्या. यानंतर, बहरीनला शेवटच्या दोन चेंडूत ७ धावांची आवश्यकता होती. कॅप्टन बिनने एक मोठा षटकार मारला आणि धावसंख्या बरोबरीत आणली. मात्र, षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली आणि सामना बरोबरीत राहिला.
🏏 Historic T20I Super Over: Bahrain Falls for 0/2 vs Hong Kong
📌 First time in T20I history a team failed to score in a Super Over as Bahrain lost to Hong Kong in the Malaysia Tri-Nation series.
🔥 Hong Kong set 129/7, Bahrain started strong but stumbled, ending in a tie. pic.twitter.com/5JgOxahCTl— Instant News 247 (@instant_news247) March 15, 2025
सुपर ओव्हरमध्ये काय घडलं?
या सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्याच निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचल्याने सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दरम्यान सुपर ओव्हरमध्ये बहरीनला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि कर्णधार बिन आणि सोहेल अहमद संघासाठी मैदानात आले. हाँगकाँगकडून सुपर ओव्हर टाकण्याची जबाबदारी एहसान खानवर सोपवण्यात आली.
हाँगकाँगने मारली बाजी –
एहसानने शानदार गोलंदाजी करताना षटकाचा पहिला चेंडू निर्धाव टाकला. यानंतर दुसऱ्याच चेंडूवर त्याने बहरीन संघाच्या कर्णधाराला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इतकेच नाही, तर लगेच त्याच्या पुढच्याच चेंडूवर सोहेललाही बाद केले. अशाप्रकारे, बहरीन संघाला सुपर ओव्हरमध्ये एकही धाव करता आली नाही. नियमांनुसार, सुपर ओव्हरमध्ये दोन विकेट पडल्यानंतर संघाचा डाव संपला असे मानले जाते. यानंतर हाँगकाँगने एक धाव काढत सामना जिंकला.





