विविधा: बहिणाबाई चौधरी

माधव विद्वांस

त्या शिक्षित नव्हत्या; पण त्यांच्या जिभेवर प्रत्यक्ष सरस्वती बोलत होती. शेतकाम आणि घरकाम सांभाळत सुंदर अर्थपूर्ण जीवनाशी निगडीत अशी कवने करणाऱ्या प्रतिभावंत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची आज जयंती. बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा) ह्या गावी नागपंचमीच्या दिवशी 24 ऑगस्ट इ.स. 1880 रोजी महाजनांच्या घरी झाला. वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान हे मुलगे आणि काशी ही मुलगी झाली. प्लेगच्या साथीत ओंकारला कायमचे अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले. नवऱ्याच्या पश्‍चात अपंग ओंकार याचा सांभाळ, सोपानचे शिक्षण व मुलीचे लग्न या जबाबदाऱ्या पार पडल्या. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या.

सोपानदेव मोठे झाल्यावर त्यांनी व त्यांचे मावसभाऊ पितांबर चौधरी यांनी काही रचना लिहून काढल्या. त्यांचे निरीक्षण आणि अनुभव यातून त्यांच्या प्रतिभेत जीवनाचे सार घेऊन काव्य अवतरले. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, शेतकाम आणि घरकाम करता करता त्यांना ओव्या सुचत आणि त्या गातही असत. अक्षर ओळख नसणाऱ्या बहिणाबाई अहिराणी भाषेत कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव त्या कागदावर लिहून ठेवत. सोपानदेव हे स्वतः कवी होतेच त्यामुळे त्यांना त्यांच्या आईच्या प्रतिभेची कल्पना होती.

कालांतराने ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. त्या वाचून अत्रे उद्‌गारले, अहो हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी 1952 मध्ये प्रकाशित झाली. संसाराचे सार आपल्या गावातून मांडणाऱ्या बहिणाबाईंचा परिचय महाराष्ट्राला झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्‍त 35 कविता आहेत. याची दुसरी आवृत्ती 1969 मध्ये प्रकाशित झाली. बहिणाबाईंच्या कविता एखाद्या निरझऱ्याप्रमाणे आहेत. तेथे निसर्ग, नाती, स्त्रीजीवन, जबाबदारी, आध्यात्म व अनुभव ध्वनित होतात.

“अरे खोप्यामंधी खोपा सुगरणीचा चांगला पहा पिलासाठी तिने जीव झाडाले टांगला’ या काव्यातून त्यांचे मातृत्व दिसून येते. “अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर’ या गाण्यातून संसाराचे चटके अनुभवण्याचा संदेश दिला आहे. “ज्याच्यातून येतं पीठ, त्याले जातं म्हनू नही’ अशा शब्दांतून सकारात्मक बोलण्याचा उपदेश करतात. स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या जीवनातील सुखदुःखाचे तसेच कष्टांचे चित्र साहजिकच त्यांच्या कवितेतून डोकावते. सोपानदेव शाळेत काय शिकविले हे आईला संध्याकाळी सांगत असत. त्या लक्षपूर्वक ऐकून कवने करीत.

जीवनाचे सार त्यांच्या कवनातून ऐकताना त्या तत्त्वज्ञानी आहेत असे जाणवते. बहिणाबाईंच्या कविता पाठ्यपुस्तकातून शिकविल्या जातात. त्यांच्या कवितांची इंग्रजीमध्येही भाषांतरे झाली आहेत. वर्ष 1961 मध्ये अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेल्या “मानिनी’ या कौटुंबिक चित्रपटामध्ये बहिणाबाईंची गाणी ध्वनिमुद्रित झाली, वसंत पवार यांनी संगीत दिले होते तर आशा भोसले व सुमन कल्याणपूर यांनी ते गायले होते. या चित्रपटातील गीतांमुळे बहिणाबाईंची गाणी रसिकांच्या ओठावर कायमची आली. बहिणाबाईंचा वयाच्या 72व्या वर्षी जळगावात 3 डिसेंबर 1951 रोजी मृत्यू झाला. बहिणाबाईंच्या स्मृतीस अभिवादन.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×