Badlapur School: ‘बदलापुरचे प्रकरण शाळेनेच दाबण्याचा प्रयत्न केला’; बाल हक्क संरक्षण आयोगाचा गंभीर आरोप

Badlapur School Girl Rape Case : बदलापुरच्या शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर शाळेने त्यांच्या पालकांना पोलिस तक्रार दाखल करण्यास मदत करण्याऐवजी हा गुन्हाच लपवण्याचा प्रयत्न केला असा आरोप, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुसीबेन शहा यांनी केला आहे.
शहा यांनी सांगितले की, ‘बालवाडीतील दोन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण हे बाल लैंगिक अत्याचाराचेच स्पष्ट प्रकरण आहे. बाल हक्क आयोगाने पालकांना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी नेले. या प्रकरणाबाबत मी शाळा व्यवस्थापनाला विचारणा केली असता त्यांनी त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
शालेय व्यवस्थापना विरुद्ध पोक्सो कायद्यातील तरतुदी का लागू करू नयेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शाळा व्यवस्थापनाने तातडीने पोलिसांना सूचना दिल्या असत्या तर बदलापूरमधील गोंधळाची परिस्थिती टाळता आली असती, असेही त्या म्हणाल्या.
पालकांना तक्रार देण्यास ११ तास थांबायला लावले गेल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे असे त्या म्हणाल्या. लैंगिक हल्ल्याची माहिती देऊनही, मुख्याध्यापकांनी पोलिसांशी संपर्क न करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी, ती शाळा व्यवस्थापनाकडे गेली, हा भयानक प्रकार आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल संरक्षण विभाग आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात एक विशेष बाल संरक्षण युनिट देखील आहे,या सर्व यंत्रणा, युनिट आणि समित्या कार्यरत आहेत. प्रणाली प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या.
भविष्यात राज्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी शैक्षणिक संस्थांसाठी संरचित कार्यपद्धतीची शिफारस करणार असल्याचेही शहा यांनी सांगितले. राज्याने अशी कार्यपद्धती लागू करून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे त्या म्हणाल्या.





