सातारा | पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यांची दुरवस्था

महाबळेश्वर – पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महाबळेश्वरमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महिन्याभरापूर्वी डांबरीकरण झालेला रस्ता सुद्धा टिकला नाही. रस्त्यांवरील डांबर गायब झाले असून, खडी सर्वत्र पसरल्याने दुचाकीचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.
महाबळेश्वरचा उन्हाळी हंगाम संपला असून, पावसाळा सुरू झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वीच शहरातील रस्त्यांची कामे केली होती. त्याचे नागरिक व पर्यटकांनी बरेच कौतुकदेखील केले होते; परंतु या रस्त्यांच्या कामांची पोलखोल पहिल्या पावसानेच केली आहे. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये पावसाळ्यात सरासरी 200 ते 250 इंच पाऊस पडतो. धो धो पडणारा पाऊस आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळित होते. अत्यावश्यक सेवेसाठी स्थानिकांना बर्याचदा सातारा, वाई येथे जावे लागते. यासाठी महाबळेश्वर-पाचगणी, महाबळेश्वर-सातारा आणि प्रतापगड घाट हे प्रमुख रस्ते आहेत. पाचगणी-महाबळेश्वर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांना पडलेले खड्डे, पसरलेली खडी आणि धुक्यातून मार्ग काढण्यासाठी रस्त्याच्या बाजूला रिफ्लेक्टर नसल्याने महाबळेश्वरवासीय हैराण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना होणार्या त्रासाची काडीमात्र काळजी प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे.
काही महिन्यांपूर्वीच महाबळेश्वरमधील रस्ते चांगल्या प्रतीचे करून, वाहतुकीत येणार्या अडचणी कायमच्या सोडवणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. या रस्त्यांसाठी मोठा निधीसुद्धा मिळाला होता. त्रासापासून मुक्ती मिळणार असल्याने, उन्हाळी पर्यटन हंगामातही महाबळेश्वरवासीयांनी या कामास प्रतिसाद दिला होता. रस्त्यांची कामे झाल्यावर बरेच कौतुकदेखील झाले. उन्हाळी हंगामाच्या मध्ये कामे सुरू असल्याने, बर्याचदा रस्ते बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे पर्यटकांचा ओघ जेमतेमच राहून, व्यापार्यांना आर्थिक झळ सोसावी लागली. उन्हाळी हंगामात अपेक्षेनुसार आर्थिक व्यवहार न झाल्याने व्यापार्यांमध्ये नैराश्य आहे.
रस्त्यांचा प्रश्न सुटला, असे वाटत असतानाच वेण्णा लेक नाक्यासमोर आणि सांडव्यासमोरील मोठ्या वळणावर डांबर निघून, सर्वत्र खडी पसरली आहे. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यात या रस्त्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याचे गांभीर्य प्रशासनाला नाही. पहिल्याच पावसात रस्त्यांची अशी अवस्था झाल्याने, या कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.





