Bachchu Kadu : एमपीएससीच्या अध्यक्ष, सचिवांनी राजीनामा द्यावा; आमदार बच्चू कडू यांची मागणी
परीक्षा प्रक्रियेची, विशेषतः प्रश्नपत्रिकांची सुरक्षा आणि गोपनीयता राखण्याची प्राथमिक जबाबदारी याच पदावर असते, असे कडू (Bachchu Kadu) म्हणाले.

Bachchu Kadu : अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित अनेक वादग्रस्त घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सचिवांनी नैतिक आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी रविवारी केली.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाकडूनच ही मागणी करण्यात आल्याने एमपीएससीच्या अध्यक्षांनी (Bachchu Kadu) राजीनामा देण्याबाबत दबाव वाढल्याचे बोलले जात आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला घेण्यात आलेल्या ड्रग इन्स्पेक्टर (गट-ब) परीक्षेचा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली होती.
बच्चू कडू म्हणाले, आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा कोणताही राजकीय संबंध नसावा. तसेच सचिव हे राज्य सचिवालयातील (मंत्रालय) कॅडरमधील अधिकारी नसून वरिष्ठ आयएएस अधिकारी असावेत. कडू यांनी आयोगाच्या सध्याच्या सह-सचिव आणि परीक्षा नियंत्रक यांच्या नियुक्तीची सविस्तर चौकशी करण्याची मागणीही केली.
आयोगाच्या मंजुरीशिवाय मंत्रालय कॅडरमधील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. परीक्षा नियंत्रकावरही फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण परीक्षा प्रक्रियेची, विशेषतः प्रश्नपत्रिकांची सुरक्षा आणि गोपनीयता राखण्याची प्राथमिक जबाबदारी याच पदावर असते, असे कडू (Bachchu Kadu) म्हणाले. तसेच, विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.






