Bacchu Kadu : मंत्रिमंडळात आकाची सत्ता, देवेंद्र फडणवीस हे मोठे आका, बच्चू कडूंनी सगळंच काढलं

मुंबई : प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकरी-शेतमजूर हक्कयात्रेदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली. “मंत्रिमंडळातील अर्ध्याहून अधिक मंत्री ‘आका’ आहेत, तर फडणवीस हे मोठे आका आहेत,” असा खोचक उल्लेख करत कडू यांनी फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. केंद्रीय आणि राज्य सरकारमधील भ्रष्टाचारावरही त्यांनी सडकून प्रहार केला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान मोदींवर टीका करत कडू म्हणाले, “हिंसाचाराच्या घटनेनंतर अडीच वर्षानंतर मोदी मणिपूरला गेले. हा नेपाळचा परिणाम आहे. मोदींना भीती वाटत आहे की स्वतःचं घर जळू नये. घरावर वेळ आली तेव्हा मणिपूरची आठवण आली, दुसरं काही नाही.” मणिपूरमधील जातीय दंगलीनंतर मोदींच्या भेटीला ‘राजकीय दबावाचा परिणाम’ असल्याचे सांगत कडू यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले.
पिक विमा आणि भ्रष्टाचारावर सडकून टीका
पीक विमा योजनेच्या निकषांबाबत बोलताना कडू यांनी फडणवीस सरकारवर तोफखाना उघडला. “पीक विम्याचे निकष बदलले आहेत, शेतकऱ्यांनी विमा काढू नये. गुजरातमध्ये या कंपन्या फिरकतसुद्धा नाहीत, फसव्या आहेत. देशात भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा लागली आहे, सर्व केंद्रीकरण झाले आहे,” असा आरोप त्यांनी केला. काही मंत्री फक्त पैसे कमवण्यासाठी पद घेतात, आणि सर्वांचे ‘मोठे आका’ फडणवीस आहेत, असे म्हणत कडू यांनी मंत्रिमंडळातील ‘आकांच्या’ संस्कृतीवर बोट ठेवले.
शेतकरी हक्कयात्रेत आक्रमक भूमिका
सध्या बच्चू कडू हे शेतकरी-शेतमजूर हक्कयात्रा काढत असून, जिल्हानिहाय दौऱ्यात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, पीक विमा आणि इतर मुद्द्यांवर सत्ताधाऱीवर टीका करत आहेत. “शेतकऱ्यांनो, आपण पेटून उठूया… आपल्या हक्कांसाठी लढूया,” असे आवाहन करत ते आंदोलनाची तीव्रता वाढवत आहेत. ही यात्रा विदर्भापासून सुरू होऊन राज्यभर पसरली असून, शेतकरी संघटनांना बळकटी देण्याचा प्रयत्न आहे. कडूंच्या या आक्रमक भूमिकेमुळे महायुती सरकारवर दबाव वाढला असून, शेतकरी नेत्यांच्या एकजुटीची शक्यता व्यक्त होत आहे.





