‘बाहुबली’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी झळकणार रुपेरी पडद्यावर

मुंबई -राज्यात आज पासून चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. योगा, स्वीमिंगपूलसह बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश आणि शूटिंग रेंज आदी इनडोअर खेळांनाही परवानगी दिली आहे. नाट्यगृहेही खुली होत आहेत. दरम्यान, कंटेन्मेंट झोनमधील चित्रपटगृह आणि नाट्यगृहांवरील बंदी तशीच राहील.
आता थिएटर आणि मल्टीप्लेक्स उघडल्यानंतर ‘बाहुबली’चे दोन्ही भाग पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बाहुबली या भव्यदिव्य चित्रपटाचा चाहतावर्ग प्रचंड खुश झाला आहे. हा चित्रपट पुढच्या शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित होईल.
“लार्जर दॅन लाइफ’ सेट, दमदार कलाकार, उत्कृष्ट कथानक व दिग्दर्शन यांच्या जोरावर “बाहुबली’च्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमविला होता. “बाहुबली : द बिगनिंग’ हा चित्रपट एका अशा निर्णायक वळणावर येऊन संपला होता की, संपूर्ण जगाला “बाहुबली : द कन्क्लुजन’ या दुसऱ्या भागाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जो विक्रम रचलाय, तो अद्याप कोणत्याही चित्रपटाला मोडता आला नाही.





