Pimpri: ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय बनले डास उत्पत्ती केंद्र
Pimpri: नागरिकांना नियम शिकवणारे प्रशासन स्वतःच बेफिकीर!

पिंपरी : नागरिकांना डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियापासून बचावासाठी दररोज जनजागृती करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्याच ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचा कारभार सध्या टीकेचा विषय ठरला आहे. चिंचवड येथील ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात अतिक्रमण कारवाईत जप्त केलेले साहित्य महिनोनमहिने उघड्यावर पडून आहे. पावसामुळे या अडगळीत मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून ते डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
महापालिकेचा आरोग्य विभाग शहरभर “साचलेले पाणी हटवा, डासांची पैदास रोखा” असे आवाहन करत आहे. घरासमोर किंवा सोसायटीत पाणी साचल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाईही केली जाते. मात्र, महापालिकेच्या स्वतःच्या कार्यालयातच नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे “लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण” अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या हातगाड्या, प्लास्टिकचे क्रेट, गंजलेले डीपी बॉक्स, लोखंडी साहित्य आणि मोठमोठे जाहिरात फलक कार्यालयाच्या आवारातच उघड्यावर टाकण्यात आले आहेत. पूर्वी हे साहित्य नेहरूनगर येथील गोदामात ठेवले जात होते. मात्र, आता ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे आवारच अडगळ साठविण्याचे ठिकाण बनल्याचे दिसत आहे.
पावसाळ्यात प्लास्टिकच्या क्रेट्स, टायरसदृश वस्तू आणि लोखंडी साहित्यामध्ये पाणी साचत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, डेंग्यूचे डास स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढतात. असे असतानाही स्वतःच्या कार्यालयातील या धोकादायक परिस्थितीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या कार्यालयात दररोज शेकडो कर्मचारी कार्यरत असतात. विविध कामांसाठी मोठ्या संख्येने नागरिक येथे येतात. कार्यालय परिसरात नागरिक सुविधा केंद्र, महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र तसेच आजूबाजूला मोठ्या गृहनिर्माण संस्था आहेत. त्यामुळे या परिसरात डासांची पैदास वाढल्यास आजारांचा धोका अधिक वाढू शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या मते, इतरांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या महापालिकेने सर्वप्रथम स्वतःच्या कार्यालयाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या अडगळीची तातडीने विल्हेवाट लावावी, संपूर्ण परिसरात डास प्रतिबंधक औषध फवारणी करावी आणि भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा होणार नाही, याची खात्री करावी.
या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा या प्रश्नावर महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
हेही वाचा:
CJP Protest : …आता CJP चं पुन्हा सर्वात मोठं आंदोलन, अभिजीत दीपकेंच्या घोषणेने देशात नवं वादळ





