Virat Kohli Record : किंग कोहलीने रचला नवा इतिहास! मुंबई इंडियन्सविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
Virat Kohli Record : विराट कोहलीने ३८ चेंडूत ५० धावा कुटत मुंबई इंडियन्सविरुद्ध नवा इतिहास रचला आहे.

Virat Kohli 1000 Runs record against Mumbai Indians : आयपीएल २०२६ मधील १२ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवरील हाय-व्होल्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. या सामन्यात ‘किंग’ विराट कोहलीने अर्धशतक झळकावत असा पराक्रम केला आहे, जो आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी कोणालाही जमला नव्हता.
या सामन्यात विराट कोहलीने एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे. मुंबई इंडियन्ससारख्या तगड्या संघाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये (आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग मिळून) १००० धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा क्रिकेट विश्वातील पहिला फलंदाज ठरला आहे. या सामन्यात विराटने केवळ धावांचा पाऊस पाडला नाही, तर आरसीबीला एक स्फोटक सुरुवातही मिळवून दिली.
केएल राहुल आणि धवनला टाकलं मागे –
🔴VIRAT KOHLI OWN MUMBAI INDIANS🔴
– Virat Kohli becomes the first batter to complete 1000 runs against Mumbai Indians in IPL history 🐐
— Sam (@Cricsam01) April 12, 2026
मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आता विराट १०१९* धावांसह अव्वल स्थानी आहे. या शर्यतीत त्याने केएल राहुल (९७७ धावा) आणि शिखर धवन (९०१ धावा) यांना मागे टाकले आहे. अजिंक्य रहाणे (८८८) आणि सुरेश रैना (८५०) हे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. मुंबईच्या गोलंदाजांना त्यांच्याच घरच्या मैदानात नमवून विराटने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
फिल सॉल्ट आणि कोहलीची वादळी भागीदारी –
विराट कोहलीला या सामन्यात सलामीवीर फिल सॉल्टची खंबीर साथ लाभली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या ६५ चेंडूंमध्ये १२० धावांची तुफानी भागीदारी केली. सॉल्टने ३६ चेंडूंत ७८ धावा कुटून मुंबईच्या गोटात खळबळ उडवून दिली. ही भागीदारी आरसीबीसाठी मुंबई इंडियन्सविरुद्धची दुसरी सर्वोच्च सलामीची भागीदारी ठरली आहे. यापूर्वी २०२३ मध्ये विराट आणि फाफ डु प्लेसिस यांनी १४८ धावा जोडल्या होत्या. विराटने या डावात केवळ धावसंख्याच वाढवली नाही, तर संघाच्या विजयाचा पायाही मजबूत केला.





