Nuwan Thushara Apologize : आरसीबीच्या खेळाडूचा ‘यू-टर्न’! बोर्डाविरुद्धचा खटला घेतला मागे; माफी मागत आयपीएलच्या वाटा केल्या मोकळ्या
Nuwan Thushara Apologize : नुवान तुषाराने श्रीलंका क्रिकेट बोर्डाशी (SLC) सुरू असलेला कायदेशीर लढा संपवण्याचा निर्णय घेतला आहे

Nuwan Thushara Apologize to SLC for Court Case : आरसीबीचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाविरुद्ध पुकारलेले बंड अखेर मागे घेतले आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामात सहभागी होण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) न मिळाल्याने कोर्टात गेलेल्या तुषाराने आता बोर्डाची माफी मागून प्रकरणावर पडदा टाकला आहे. यासह त्याने बोर्डाशी सुरू असलेला कायदेशीर लढा संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने फिटनेस टेस्टच्या कारणास्तव आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी नाकारल्याने तुषाराने कोर्टाची पायरी चढली होती. मात्र, आता त्याने बोर्डाला ईमेल लिहून आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. “बोर्डाला त्रास देण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, मी केवळ अन्यायाविरुद्ध दाद मागत होतो,” असे तुषाराने आपल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे तो यंदाच्या आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीकडून खेळताना दिसणार नाही. हा आरसीबी संघासाठी एक मोठी धक्का मानला जात आहे. कारण अगोदर त्यांचा वेगवान गोलंदाजी कमकुवत दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय होतं?
Nuwan Thushara apologises to Sri Lanka Cricket and offers to withdraw legal action over NOC dispute 🇱🇰#IPL2026 pic.twitter.com/2xlEBrjCtl
— Home of T20 (@HomeofT20) April 10, 2026
श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार, जोपर्यंत खेळाडू फिटनेस चाचणी (Fitness Test) यशस्वीरित्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत त्याला परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी ‘एनओसी’ दिली जात नाही. पाथुम निसंका आणि दासुन शनाका यांनी ही चाचणी पूर्ण केल्याने ते सध्या आयपीएलमध्ये खेळत आहेत. मात्र, मथीशा पथिराना आणि नुवान तुषारा यांनी अद्याप ही चाचणी पूर्ण न केल्याने ते भारतात पोहोचू शकले नव्हते. या प्रकरणी २३ एप्रिल रोजी कोर्टात सुनावणी होणार होती, परंतु त्यापूर्वीच तुषाराने माघार घेतली आहे.
हेही वाचा – George Linde : केकेआरविरुद्धच्या विजयानंतर लखनौला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू IPL 2026 मधून बाहेर; ‘या’ खेळाडूची एन्ट्री
हसरंगा बाहेर, जॉर्ज लिंडेची एन्ट्री –
दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सला बसलेला वानिंदू हसरंगाचा धक्का आता कायमस्वरूपी झाला आहे. हसरंगा फिटनेसमुळे आयपीएल २०२६ मधून बाहेर पडला असून त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू जॉर्ज लिंडे याचा समावेश करण्यात आला आहे. लिंडेला २५० टी-२० सामन्यांचा अनुभव असून त्याच्या नावावर २१८ बळी आहेत. हसरंगाला लखनौने २ कोटींच्या बेस प्राईसवर खरेदी केले होते.





