pune district : आयुर्वेद शास्त्र हे शाश्वत उपचार पद्धती

मांडवगण फराटा : आजच्या स्पर्धेच्या युगात आयुर्वेद शास्त्र हे शाश्वत उपचार पद्धती आहे, असे मत महिलांच्या आरोग्याचे व्यवस्थापनाबाबतच्या कार्यशाळेतील वक्त्यांनी व्यक्त केले. आयुर्वेद म्हणजे नक्की काय आहे हे आजच्या पिढीला समजावे म्हणून फराटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात आयुर्वेदिक फर्मास्युटिकलचा परिचय व ताण व्यवस्थापन आणि महिलांचे आरोग्य व्यवस्थापन विषयी कार्यशाळा संपन्न झाली. यात आयुर्वेदाबाबतच्या अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. शेवाळे यांनी सांगितले आयुर्वेद शास्त्र हे शाश्वत व नित्य टिकणारे असून त्याचा उपयोग सतत होत राहणार आहे. स्पर्धेच्या युगात आपण कितीही प्रगती केली असली तरीही वैद्यकीय क्षेत्र आयुर्वेद शिवाय परिपूर्ण नाही. आयुर्वेदात भारतीय प्राचीन वैद्यकीय ज्ञानाची प्रचिती येते. आपल्या जीवनात सुख, दुःख ,हित, अहित,समाधान, नैराश्य ,वयोमान याचा इत्यंभूत अभ्यास आयुर्वेदात मिळतो. डॉ. कट्टी यांनी आयुर्वेद हे मानवाचे स्वास्थ, निरोगी ठेवण्याचे उपाय आयुर्वेदात सापडतात. मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या जुनाट आजारावर आयुर्वेदात उपचार सापडले आहेत, असे सांगितले.
डॉ. शिल्पा कत्ते म्हणाल्या, महिला व त्यांच्या जीवनशैलीमध्ये असणाऱ्या गरजा आपण समजून घेणे गरजेचे आहे.ती आई, बहीण,पत्नी,सासू ,मैत्रीण अशा अनेक अनेक जबाबदाऱ्या यशस्वी निभावून नेते.यात बहुतेक वेळा मानसिक ताण सहन करावा लागतो. कमी जास्त प्रमाणात सर्वच महिलांना याचा सामना करावा लागतो. सतत ताण पडत असल्याने त्याचा शरीरावर व मनावर विपरीत परिणाम होऊन शारीरिक व्याधी जडतात.वेळीच ताणाचे व्यवस्थापन केले तर मन आणि शरीर दोन्हीही निरोगी राहते.या सर्वांचा अभ्यास आयुर्वेदात सापडतो.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एच. व्ही.कांबळे, श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान अध्यक्ष राजीव फराटे, सचिव मृणाल फराटे,प्राचार्य विवेक सातपुते, प्रा.ओंकार नवले,प्रा.स्नेहल फराटे, प्रा.आदिती वाघमारे, प्रा.मोनिका बारहाते, प्रा.चैताली पाचपुते, प्रा.विराज पठारे उपस्थित होते. प्रा.अंकिता गोरे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा.अमृत भंडारी यांनी मानले.





