अयोध्यानगरी रामरंगात सजली; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी शहरात उत्साहाचे वातावरण

अयोध्या – राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसाठी अवघे काही तास शिल्लक असताना संपूर्ण अयोध्यानगरी रामरंगात रंगली आहे. प्राण प्रतिष्ठेसाठी देशभरातून विविध नद्यांचे पाणी, कन्नौजमध्ये खास तयार केलेल अत्तर आले आहे. तसेच निमंत्रितांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. तसेच श्री रामाच्या मूर्तीसाठी खास पोषाख तयार झाला आहे.
श्रीरामाच्या मूर्तीला स्नान घालण्यासह विशेष विधी करण्यात आले असून देशभरातून विविध तीर्थक्षेत्रांहून आणलेल्या पवित्र जलाने गाभाऱ्याचे शुद्धीकरण करण्यात आले. प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून विविध १४ जोडप्यांची म्हणून निवड करण्यात आली आहे.
मंदिरालाही फुलांची सजावट व रोषणाई केली जात आहे. मंदिर, त्याचा परिसर, तसेच प्रवेशद्वार सजवण्यासाठी मोठया प्रमाणात उत्तम दर्जाच्या फुलांचा तसेच विशेष दिव्यांचा वापर केला जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अयोध्येमध्ये ठिकठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमा दिसत आहेत. चित्रकार विविध चित्रे काढत आहेत, रांगोळया सजत आहेत.
प्राण प्रतिष्ठेसाठी खास तयार करवून घेतलेल्या वस्तूंबरोबरच भाविकांनी देशभरातून पाठवलेल्या वस्तूही अयोध्येत दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये महाकाय घंटा, विशाल कुलुप, १२७६ किलो वजनाचा लाडू अशा वेगवेगळया वस्तूंचा समावेश आहे.
पासशिवाय प्रवेश नाही
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी रामनगरी सील करण्यात आली आहे. सर्व प्रवेश मार्गांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. येथून पासशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सुरक्षा यंत्रणांनी पंतप्रधान आणि इतर पाहुणे ज्या मार्गावर जातील त्या मार्गावर बांधलेल्या घरांची पडताळणी केली आहे. कार्यक्रमादरम्यान सशस्त्र सैनिक त्यांच्या छतावरही सज्ज असतील.
फुलांनी सजली अयोध्या
या भव्य सोहळ्यासाठी फुलांनी आणि विशेष दिव्यांनी अध्योध्या सजवण्यात आली आहे. अयोध्या शहर राममय होत असल्याचे अयोध्यावासीयांचे म्हणणे आहे. सजावटीसाठी फुलांचा समृद्ध साठा वापरण्यात आला आहे आणि 22 जानेवारी रोजी होणार्या सोहळ्याच्या दृष्टीने मंदिराची सजावट करण्यासाठी फुलांचे विशेष डिझाइन तयार करण्यात आले आहेत. ही सर्व फुले जास्त काळ ताजे राहणारी असल्याने अभिषेक समारंभापर्यंत ही फुले ताजी राहतील. या फुलांच्या सुगंधाने आणि सौंदर्याने मंदिराचे दिव्यत्व आणखीनच वाढले आहे.





