Ayesha Khan: ‘धुरंधर’मधील ‘शरारत’ गाण्याने १०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला; आयशा खान भावूक

Ayesha Khan: अभिनेत्री आयशा खान सध्या यशाच्या शिखरावर आहे. ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘शरारत’ या गाण्याने यूट्यूबवर १०० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. चित्रपटासोबतच त्यातील गाणीही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली असून ‘शरारत’ हे गाणे सोशल मीडियावर तसेच चित्रपटगृहांमध्येही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
या मोठ्या यशानंतर आयशा खानचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती गर्दीने भरलेल्या थिएटरमध्ये बसून मोठ्या पडद्यावर आपले गाणे पाहताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत तिने एक भावनिक आणि ताकदीने भरलेला संदेशही लिहिला आहे.
आयशाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले,
“१०० मिलियन व्ह्यूज! गर्दीने भरलेल्या थिएटरमध्ये स्वतःला मोठ्या पडद्यावर पाहणे हा माझ्यासाठी खूप खास अनुभव होता. ‘शरारत’ गाण्याला मिळालेलं प्रेम शब्दांत मांडता येणारं नाही.” तिची ही पोस्ट सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली असून चाहत्यांनी कमेंट्समधून तिचे भरभरून अभिनंदन केले आहे.
‘मी राज्य करायला आले आहे, मला कोणी थांबवू शकत नाही’
या पोस्टमधून आयशाने चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांचे आभारही मानले आहेत. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा आणि दिग्दर्शक आदित्य धर यांनी आपल्यावर विश्वास दाखवला, याबद्दल तिने त्यांचे विशेष आभार मानले.
View this post on Instagram
आयशा लिहिते,
“मी राज्य करायला आले आहे आणि मला कोणीही थांबवू शकत नाही. हा अहंकार नाही, तर मी माझ्या कामात घातलेल्या मेहनतीवर असलेला विश्वास आहे.” तिने पुढे असेही म्हटले की, आपल्या कामावर आणि देवावर तिला पूर्ण विश्वास आहे आणि एक दिवस तिने ज्या गोष्टींसाठी प्रार्थना केली आहे, त्या सगळ्या नक्कीच पूर्ण होतील.
२०२६कडून मोठ्या अपेक्षा
आयशा खानने आपल्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना आपली खरी ताकद असल्याचे सांगितले. विशेषतः सर्वेश शशी आणि शहबाज खान यांचा उल्लेख करत तिने म्हटले की, त्यांच्याशिवाय हा प्रवास शक्य झाला नसता. पोस्टच्या शेवटी आयशाने लिहिले, “अल्लाह करो २०२६ आमच्या आयुष्यात सुंदर गोष्टी आणि महत्त्वाचे धडे घेऊन येवो.”
‘शरारत’ गाण्याच्या यशामुळे आयशा खानला इंडस्ट्रीतील उभरती स्टार म्हणून भक्कम ओळख मिळाली असून, आता चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्ट्सकडून अधिक धमाक्याची अपेक्षा आहे.




