Pune Market Yard : मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागात कामगारांची जनजागृती रॅली
Pune Market Yard : १ नोव्हेंबरपासून ५० किलोपेक्षा अधिक वजनाचा शेतीमाल उतरणार नाही! कामगार संघटनांचा निर्धार

पुणे- शेतकरी, व्यापारी आणि हमाल-कामगारांच्या हिताचा विचार करून, ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणीतील शेतीमाल बाजारात आणू नये, या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी पुणे बाजार समितीच्या मार्केट यार्डातील फळ-भाजीपाला व कांदा-बटाटा विभागात कामगार संघटनाच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियनच्या पुढाकाराने आयोजित रॅलीत इतर कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणीतील शेतीमाल बाजारात आणण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून याबाबत आदेश काढला आहे.
या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने कामगार संघटनांनी वारंवार आंदोलने व पाठपुरावा केला आहे. १ नोव्हेंबरपासून ५० किलोपेक्षा अधिक वजनाचा शेतीमाल उतरवून घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका सर्व कामगार संघटनांनी घेतली आहे. कामगारांच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि त्यांच्यावरील शारीरिक ताण कमी करणे हा या भूमिकेमागील प्रमुख उद्देश आहे.
या रॅलीस कामगार युनियन अध्यक्ष संतोष नांगरे, विशाल केकाणे, सूर्यकांत चिंचवले, संजय साष्टे, दिपक जाधव, भरत शेळके, शंकर कसबे, गणेश शिर्के, महेश शिंदे, सचिन कांदे, किशन गोविंदवाड यांच्यासह अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.
‘१ नोव्हेंबरपासून कोणत्याही परिस्थितीत ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणीतील शेतीमाल उतरवून घेतला जाणार नाही. तसेच, तो इतर कोणालाही खाली करू दिला जाणार नाही. अतिवजनाच्या गोण्यांमुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मणका, गुडघे व मानेच्या आजारांमुळे अनेकांवर नोकरी सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे.’- संतोष नांगरे, अध्यक्ष – श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियन.





