“या’ कारणासाठी पेट्रोलमध्ये पाणी मिसळू देऊ नका! नाही तर पस्तावाल…

मुंबई – तुम्ही कार चालवत असा किंवा बाईक. मात्र तुम्ही तुमची कार अथवा बाईक सर्व्हिसिंगला दिली असेल, तर पेट्रोलच्या टाकीमध्ये पाणी जाणार नाही, यावर तुम्हाला लक्ष ठेवावे लागेल. अन्यथा तुमची कार अथवा बाईक सुरुच होणार नाही; स्टार्टींग ट्रबल देईल. कारण समजून घ्या आणि त्याप्रमाणे त्वरीत कार्यवाही करा, अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते.
पेत्रोलियम ट्रेडर्स वेल्फेअर आणि लेगल सर्व्हिस सोसायटीने याबाबत एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार पेट्रोल हे इंधन वापरणाऱ्या सर्वांना काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या संस्थेने म्हटले आहे की, सध्या कोणत्याही पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉलचा समावेश करण्यात आला आहे. पर्यावरण-स्नेही उपक्रम म्हणून वायू प्रदुषण कमी करण्यासाठी 10 टक्के इथेनॉल इंधनामध्ये मिसळायला सरकारने अनिवार्य केले आहे.
त्यासाठी खालील काळजी घेणे आवश्यक ठरते आहे…
1. आपण कार/बाईक पार्क करतो तेथे पेट्रोल टाकीवर पाणी गळत नाही ना, हे पहावे.
2. आपल्या कार/बाईकच्या पेट्रोल टॅंकच्या झाकणातून पाणी टाकीत जात नाही ना/ झिरपत नाही ना, हे पहावे.
3. कार/बाईक वॉशला दिल्यानंतर, सर्व्हिसिंग सेंटरमध्ये कार/बाईकच्या टाकीत पाणी जाणार नाही ना, हे पहावे
4. पावसाळ्यात कार/बाईक उघड्यावर पार्क केली असेल, तर टाकीत पाणी जात नाही ना, हेही पहावे.
काय होईल पेट्रोलच्या टाकीत पाणी गेल्यास?
इथेनॉल मिश्रीत पेट्रोलमध्ये पाणी गेले तर हे पाणी इथेनॉल आणि पेट्रोलला वेगळे करणे. इथेनॉल पेट्रोलपेक्षा जड असल्याने या इथेनॉलचा थर पेट्रोल टाकीच्या तळाशी जमा होतो. या थरामुळे फ्लोट पाईपमध्ये इथेनॉल अडकून बसते. परिणामी, इंधन पुरवठा इंजिनला न झाल्याने एक तर स्टार्टींग ट्रबल येते किंवा कार/बाईक सुरुच होत नाही. कार/बाईकच्या टाकीत पाणी शिरल्याने निर्माण होणाऱ्या समस्येला पेट्रोलियम विकणारे व्यावसायिक जबाबदार नसल्याचेही या संस्थेने म्हटले असल्याने आता तातडीने प्रत्येकाने आपल्या कार/बाईकच्या टाकीत पाणी शिरत नसल्याची खात्री करुन घेणे अत्यावश्यक ठरले आहे.





