Avinash Jadhav – विधानसभा निवडणुकीत झालेल्या सपाटून पराभवानंतर मनसेला आणखी एक धक्का बसला आहे. राज ठाकरेंच्या गटातील एका मोठ्या नेत्याने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मनसेला ठाणे, पालघर जिल्ह्यात मोठे खिंडार पडले आहे. मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. ठाणे पालघरमध्ये पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांनी निवडणूका लढविल्या होत्या. अविनाश जाधव स्वतः ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूकीच्या मैदानात होते. परंतु भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी त्यांचा पराभव केला. या मतदारसंघात अविनाश जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या इतर उमेदवारांचाही पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत अखेर अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्ष पदावरून राजिनामा दिला आहे. या निर्णयामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.