Satara | सामान्य कुटुंबातील अविनाश धनावडे राज्यात अव्वल

मेढा, (प्रतिनिधी) – येथील सामान्य कुटुंबातील, वडाप वहातुक करणारे बाबा धनावडे यांचे चिरंजीव अविनाश धनावडे यांनी राज्य राखीव पोलिस दलाची परिक्षा १९३ गुण मिळवित राज्यात अव्वल येण्याचा मान मिळविला.
या यशाबद्दल वेण्णा चौक व्यापारी मित्र समुहाच्यावतीने अविनाश धनावडे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पांडूरंग धनावडे टेलर, संजय जुनघरे, सुरेश शेलार, अजित धनावडे, ओंकार मोहळकर, अरविंद जवळ, संतोष पवार, आकाश ओसवाल, गणेश भोसले, अंबालाल गांधी, शैलेश पवार, कुणाल ओंबळे उपस्थित होते.
अविनाश यांचे वडील बाबा धनावडे यांचा दोन वर्षापूर्वी मोठा अपघात झाला होता. जीवनाशी संघर्ष करत दवा व लोकांकडून त्यांना मिळालेला दुवा याच्या बळावर बाबा धनावडे हे याच्यातून बरे झाले.
गेली दोन वर्ष वडीलांची सेवा करत असताना आपल्या ध्येयापासून अविनाश हे तसूभरही हटले नाहीत. जिद्द, चिकाटी, मेहनत घेवून शारिरीक व्यायाम, अभ्यास या गोष्टी सातत्याने सुरू ठेवल्या होत्या.
गतवर्षी पोलीस भरतीमध्ये केवळ १ मार्कने यशाने हुलकवणी दिली पण खचून न जाता नव्या उमेदीने अभ्यास करून अविनाश यांनी राज्य राखीव बलाची परिक्षा १९३ गुण मिळवून राज्यात अव्वल येण्याचा मान मिळविला. त्याच्या या यशाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.





