Pune News : हजारो तरुणांना रोजगार देणाऱ्या राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला

माळेगाव : राज्याच्या सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात हजारो तरुणांना रोजगार देणाऱ्या राणा सूर्यवंशी यांच्यावर काल सायंकाळी निर्घृण प्राणघातक हल्ला झाला. गेल्या पंधरा वर्षांपासून गडचिरोलीसारख्या संवेदनशील भागात सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या सूर्यवंशी यांच्यावर झालेला हा हल्ला म्हणजे सामाजिक यशावर टाकलेली हिंसेची सावली आहे.
सोलापूर दौऱ्यावर असताना, अक्कलकोट दर्शन करून परतत असताना, त्यांच्या गाडीवर अचानक हल्ला झाला.हल्लेखोर बोलेरो जीप (MH 42 24 29) मधून आले. हातात पिस्तूल, धारदार शस्त्र, आणि डोळ्यात हिंसेचा धूर हे दृश्य अंगावर शहारे आणणारं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन लालू राठोड (मुळेगाव तांडा, सोलापूर), आकाश मधुकर चव्हाण, कृष्णा फुलचंद पवार (वडजी कॅनल तांडा),अविनाश शिवाजी राठोड (बक्षी हिप्परगा तांडा) या चौघांनी मिळून राज्याच्या सामाजिक यशावर हल्ला चढवला. राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख म्हणून ओळखले जाणारे सूर्यवंशी हे केवळ उद्योगपती नाहीत. ते हजारो तरुणांच्या रोजगाराचे कारण आहेत.
अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये अंगरक्षक पोलीस कर्मचारी वामन पिसे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून, एक आरोपी अटकेत आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी या प्रकरणाकडे थेट लक्ष ठेवून आहेत. कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “घटनेचे नवे पैलू समोर येण्याची शक्यता आहे तपास बारकाईने सुरू आहे.”
या हल्ल्यामागे सामाजिक कार्यातून निर्माण झालेली अस्वस्थता, असुरक्षितता आणि संभाव्य नक्षली संबंध असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.राणा सूर्यवंशी यांनी स्वतः सुरक्षित असल्याचं सांगितलं असलं, तरी या घटनेने राज्यभरात अस्वस्थता निर्माण केली आहे. हा हल्ला म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या मार्गावर टाकलेला दहशतीचा दगड आहे.





