Indapur Crime : वडापुरीत दहशतीची रात्र ! शेळी मालकावर जीवघेणा हल्ला; ४ जनावरे केले लंपास
Indapur Crime : ग्रामीण भागात शेळीचोरीच्या घटनांमध्ये वाढ; तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींचा शोध घेण्याची ग्रामस्थांची मागणी.

Indapur Crime – तालुक्यातील वडापुरी येथे शेळीचोरीला विरोध केल्याचा ‘गुन्हा’ केवळ एवढाच आणि त्याची शिक्षा म्हणून शेळी मालकावर जीवघेणा हल्ला! रविवारी (दि. ८) मध्यरात्री दीडच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. वसंत पवार यांना गंभीर मारहाण करून चोरट्यांनी तीन शेळ्या व एक बोकड असा सुमारे २० हजार रुपयांचा माल लंपास केला.
या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री कुत्री भुंकत असल्याने वसंत पवार बाहेर पाहण्यासाठी गेले असता शेळ्यांजवळ दोन अनोळखी इसम संशयास्पद हालचाली करताना दिसले. त्यांनी आवाज देत त्यांच्या दिशेने धाव घेताच एका चोरट्याने दगड फेकून त्यांच्या डोक्यात मारला, तर दुसऱ्याने जवळ पडलेला खुंटी ठोकायचा घन पाठीवर प्रहार केला.
या हल्ल्यात पवार गंभीर जखमी झाले.दरम्यान, चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत चार जनावरे घेऊन पळ काढला. जखमी अवस्थेत पवार यांनी शेजारी विठ्ठल जाधव यांना बोलावले. त्यानंतर सुरवड येथील स्वप्निल घोगरे यांच्या चारचाकी वाहनातून त्यांना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेचा तपास इंदापूर पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.
मात्र वाढत्या शेळीचोरीच्या घटनांमुळे आणि थेट मालकावर हल्ला झाल्याने तालुक्यातील शेळीपालक धास्तावले आहेत. “अशा चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करा,” अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ग्रामीण भागात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.





