साताऱ्यात शाळकरी मुलीच्या गळ्यावर चाकू! प्रेमभंगातून जीवघेणा हल्ला, नागरिकांनी केली धुलाई

सातारा – एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका माथेफिरू युवकाला जमावाने पकडत त्याची चांगली धुलाई केली. हा प्रकार करंजे बसपा पेठेतील एका इमारतीच्या परिसरात घडला. जमावाने प्रसंगावधान राखून त्या मुलीला सुरक्षितरित्या सोडवले. या प्रकाराने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस सागर निकम, धीरज मोरे, उमेश ठाकरे, अमोल इंगवले यांनी या युवकाला ताब्यात घेतले. हा युवक अल्पवयीन असल्याची खात्री पोलिसांकडून करण्यात येत होती. दुपारी चारच्या दरम्यान या युवकाचे संबंधित विद्यार्थिनी बरोबर काही कारणांवरून वाद झाला, तेव्हा त्याने अचानक आक्रमक पवित्रा घेत मुलीच्या गळ्याला चाकू लावला. यामुळे एकच भीतीचे वातावरण तयार झाले. जमलेल्या जमावाने मुलीला सोडण्याची विनंती केली पण तो युवक काही केल्या ऐकत नव्हता. त्या ठिकाणाहून सर्वांना निघून जायला सांगत होता. ती मुलगी ही त्या युवकाला समजावून सांगताना दिसत होती.
काही व्यक्तींनी त्या मुलाचे लक्ष वळवलं, त्याच वेळी मागच्या कंपाउंडहून तरुण पुढे येऊन त्याने त्या युवकाला मागून पकडले. समोरच्या तरुणाने त्याच्यावर झडप घातली आणि युवकाच्या हातातून चाकू काढून घेतला. हा थरारक प्रकार सुमारे दहा ते पंधरा मिनिटे सुरू होता. शाहूपुरी पोलिसांनी तात्काळ या युवकाला ताब्यात घेतले आहे. याआधीही या युवकाने असाच प्रकार केल्याची स्थानिकांनी माहिती दिली.
पीडित युवती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. साताऱ्यातील एका नामवंत शाळेची ती विद्यार्थिनी आहे. या मुलीला जमावातल्या काही महिलांनी धीर दिला. या प्रकरणाचा शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे अधिक तपास करत आहेत.





